• Download App
    Sharad Pawar Praise Devendra fadnavis पवारांची फडणवीस स्तुती, हे विरोध मावळल्याचे लक्षण की त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे लक्षण??

    पवारांची फडणवीस स्तुती, हे विरोध मावळल्याचे लक्षण की त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे लक्षण??

    नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नायक ग्रंथात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी फडणवीसांची स्तुती करणारा लेख लिहिला. देवेंद्र यांची कार्याची गती अफाट आहे, अशी स्तुतीसुमने पवारांनी लेखात उधळली. त्यातून पवारांनी आपल्याच कन्येच्या “अकेला देवेंद्र क्या करेगा?”, या सवालाला बऱ्याच वर्षांनी का होईना, पण लेखी उत्तर देऊन टाकले!!

    पण त्यामुळेच पवारांनी केलेली ही फडणवीस स्तुती हे त्यांचा फडणवीसांच्या नावाला असलेला विरोध मावळल्याचे लक्षण मानायचे, की पवारांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे लक्षण मानायचे??, असा सवाल तयार झालाय.

    कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2014 पासून ते 2025 पर्यंत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे “दोन ध्रुवांवर दोघे आपण” अशी स्थिती राहिलीय. शरद पवारांचा भाजपला किंवा कुठल्याच पक्षाला खरा विरोध नाही, विरोध असलाच तर तो देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीला होता आणि आहे, असे नेहमीच बोलले गेले‌. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी नितीन गडकरी किंवा अन्य कुठल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी निवडले असते, तर पवारांनी केव्हाच त्या सरकारला पाठिंबा देऊन टाकला असता. कारण महाराष्ट्रात कुणीही मुख्यमंत्री होवो, तो आपले “ऐकणारा” असला पाहिजे हा पवारांनी स्वतःच स्वतःला घालून घेतलेल्या दंडक ठरलाय. पण देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असे होते आणि आहेत की ज्यांनी पवारांचे पवारांना हवे तसे कधी “ऐकले” नाही. (असे मानले गेले.) म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या ब्राह्मण असण्याचे राजकीय भांडवल करून पवारांनी कायमच फडणवीस यांच्या नावावर फुली मारली आणि पवारांनी त्यांच्या नावावर फुली मारली म्हणूनच भाजपच्या नेतृत्वाने स्वतःच्या “पॉलिटिकल प्रायोरिटीज” साठी फडणवीस यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमले. (असेही बोलले गेले)

    – फडणवीस स्तुतीचा लेखी पुरावा

    अर्थात हे काही असो, गिरीश महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नायक ग्रंथात शरद पवारांनी लेख लिहून फडणवीस यांच्या कार्यशैलीची आणि काम करण्याच्या झपाट्याची स्तुती केली. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची गती अफाट आहे. विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, अशी पवारांनी त्या लेखात म्हटलेय. त्याचवेळी त्यांनी शिडशिडीत आणि स्थूल या दोन शब्दांवर भर देऊन विनोदही केलाय. आता खुद्द पवारांनीच नावाने तो लेख लिहिल्यामुळे त्यांच्या फडणवीस स्तुतीचा लेखी पुरावा उपलब्ध झाला.

    ... की खांद्यावर हात??

    पण काही झाले ते ते “शरद पवार” आहेत. पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते करतात. पवारांनी ज्यांना खरा विरोध केला, ते राजकारणात वरची पायरी चढले. पण पवारांनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला, ते खाली गाडले गेले, असा आत्तापर्यंतचा पवारांच्या कामाचा लौकिक आहे. त्यामुळेच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली, याचा अर्थ त्यांचा फडणवीसांच्या नावाला असलेल्या विरोध मावळला की पवारांनी फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवला??, असा सवाल तयार झाला. या सवालाचे उत्तर पवारांच्या लेखातून मिळाले नाही.

    Sharad Pawar Praise Devendra fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!

    करून सावरून रेव्ह पार्टी, राजकीय आरोप प्रत्यारोपांमधून आरोपींना victim card खेळायची संधी!!

    Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, खासदार उज्ज्वल निकम यांचा घणाघात