अनेकांना हिजाब घालणे योग्य वाटत आहे. तर अनेकांना शाळेत गणवेशच घालणे योग्य वाटत आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळतोय. दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यात हेमा मालिनी, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा, सोनम कपूर, कंगना रनौत आणि आता शबाना आझमी यासारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. दरम्यान नेहमीच वादग्रस्त मुद्यांवर आपले मत व्यक्त करुन चर्चेत राहणारी कंगना रनौतने ट्विट केल्यानंतर या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून अभिनेत्री शबाना आझमी यांनी पोस्ट केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई:कंगना प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच कर्नाटकातील एका महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशभर गाजला आहे. राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड स्टार्सनीही यावर आपलं मत मांडलं आहे. त्यानंतर कंगनानेही हिजाबच्या वादावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. हिंमत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता राहून दाखवा, असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर आता शबाना आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.Shabana vs Kangana
शबाना आझमी यांनी काय लिहिले आहे?
कंगनाच्या पोस्टला उत्तर देताना शबाना आझमी यांनी लिहिले की, “मी जर चुकत असेल, तर सुधारवा, पण अफगाणिस्तान हे एक धर्मशासित राज्य आहे. पण मी शेवटची तपासणी केली तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता.?”
कंगनाने काय लिहिले?
कंगना रणौतने लिहिले की, “जर तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा न घालता राहून दाखवा…स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका.”
जावेद अख्तर यांनीही दिली प्रतिक्रिया
जावेद अख्तर यांनी ट्वीट करत लिहिले की, “मी कधीही हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही तिथेच कायम आहे, त्याचवेळी मुलींच्या त्या लहान गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हे त्यांचे ‘पुरुषत्व’ आहे का? ही खेदाची गोष्ट आहे.”
जानेवारीमध्ये उडुपीच्या ए कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती.