- मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले.
वृत्तसंस्था
मुंबई: राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी वरून बॉंब ठेवल्याचे सांगितले. मंत्रालयात बाँब ठेवण्यात आल्याच्या एका फोनमुळे आज मुंबईत पोलीस यंत्रणा हायअलर्टवर पहायला मिळत आहे. दुपारी पाऊण वाजल्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात एका व्यक्तीनं कॉल करुन मंत्रालय बाँबने उडवून देण्याची धमकी दिली. ज्यानंतर तात्काळ पोलीस आणि बॉंब शोधक पथकाने परिसर सील करुन तपासाला सुरुवात केली.Search operation begins after phone call of bomb plant in Mantralaya in Mumbai
मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले . डॉग स्क्वाडही बॉम्बचा शोध घेत होते. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
पोलिसांनी संपूर्ण परिसर निर्मनुष्य करुन मंत्रालयाच्या परिसराची झाडाझडती घेतली. या तपासणीमध्ये बॉम्बसदृष्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही. ज्या नंबरवरुन फोन आला त्याचा तपास पोलीसांनी केला.
सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरमधील सागर मंदेरे या तरुणाने हा दूरध्वनी केला होता. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.