विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच पंतप्रधान मोदी रशिया युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरिय बैठक घेणार आहेत. रशिया आणि यूक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर कब्जा करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. तर यूक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. हजारो भारतीय युक्रेमध्ये अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.Prime Minister Modi leaves Uttar Pradesh for Delhi; High-level meeting on Russia-Ukraine war
दुसरीकडे यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेही मोठा दावा केलाय. युद्धात रशियाचे 4 हजार 300 सैनिक मारले गेल्याचा दावा यूक्रेनकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर 146 रणगाडे, 27 विमान आणि 26 हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचंही यूक्रेनकडून सांगण्यात आलंय.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल फोनरुन संवाद साधला होता. व्होदिमर झेलेन्स्की यांनी मोदींना संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली होती. UNSC मधील मतदानात भारताच्या स्वतंत्र आणि संतुलित भूमिकेची व्होदिमर झेलेन्स्की यांनी प्रशंसा केली होती. यावेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल सर्व माहितीही देण्यात आली होती.
व्होदिमर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मोदींनी शांतता पुनर्स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, मोदींनी तेथे सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिकांच्या जलद आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.