युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असून सीमा भागाजवळ असलेल्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील जवळपास 100 हून जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक मार्गांचा अवलंब करत आहे आता पोलंड मार्गे भारतीयांना आणले जाणार असल्याची माहिती आहे.Russia-Ukraine-India: More than 100 students from Maharashtra stranded in Ukraine, government efforts to bring them back safely
दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसायाच्या निमित्त गेलेल्या आणि तिकडे अडकलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक, पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. काही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर काही नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहेत.
मराठवाड्यातील 61 विद्यार्थी
मराठवाड्यातील 61 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये औरंगाबाद 3 , जालना 7, नांदेड 20 ,परभणी 4 , लातूर 21, उस्मानाबाद मधील 6 विद्यार्थांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत .
अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. सगळे विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत.
गोंदियातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून पवन मेश्राम, मयूर नागोसे आणि उमेंद्र भोयर अशी त्यांची नावं आहेत. हे तिन्ही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये युक्रेनला गेले होते.
बेळगावचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी बेळगाव प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.