छद्मबुद्धीचे सनदी उसासे उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बाहेर पडले. माजी सनदी अधिकारी आणि प्रख्यात साहित्यिक भारत सासणे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता “छद्मबुद्धीचे विदुषकी शासक” असे शरसंधान साधून घेतले, त्यावेळी त्यांना आपल्याच शेजारीच बसलेली “उद्घाटक छद्मबुद्धी” अर्थातच दिसली नव्हती…!! उदगीर मध्ये बसून “बारामती छद्मबुद्धी” दिसत नाही… पण दिल्लीत सातच वर्षांपूर्वी गुजरात मधून पोहोचलेली “छद्मबुद्धी” लगेच दिसते… याला म्हणतात मराठी साहित्यिकांनी सनदी सेवेत राहून “कमावलेली दूरदृष्टी”…!!Ramchandra Guha: English “Ramchandra” version of the pseudo-Ushad of pseudo-intellect
अशाच छद्मबुद्धीच्या “कमावलेल्या दूरदृष्टी”ची इंग्रजी आवृत्ती आजच “द स्क्रोल” मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अर्थातच ती “रामचंद्री” आवृत्ती आहे…!! रामचंद्र गुहांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या एका जुन्या लेखनाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “निरंकुश” सत्तेवर शरसंधान साधले आहे. एकाच राजकीय पक्षाकडे वर्षांनुवर्षे सत्ता राहिली तर देशाची वाटचाल लोकशाही कडे न होता निरंकुश सत्तेकडे होत राहते आणि ती अंतिमतः देशाला घातक ठरते, असा इशारा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी ऑगस्ट 1957 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक खास निबंध लिहून दिला होता. त्यामध्ये त्यांनी लोकशाही विषयक काही सिद्धांताची मांडणी केली होती. त्यामध्ये एकपक्षीय लोकशाही, तिला मिळणारा जनाधार, विरोधी पक्षांचे लोकशाहीतले महत्त्व वगैरे बाबींचा राजाजींनी त्यांच्या उत्तम इंग्रजीत उहापोह केला होता.
कोण होते राजाजी?
राजाजी हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. महात्मा गांधींचे व्याही होते. सुरुवातीला ते नेहरूंचे निकटवर्ती होते किंबहूना गव्हर्नर जनरल पदावरून त्यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्याचा आग्रह नेहरूंनी धरला होता. परंतु, त्या वेळच्या काँग्रेसमध्ये सर्वाधिक प्रभावी असणाऱ्या वल्लभभाई पटेल गटाने पंडितजींचा आग्रह मोडून काढत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती राष्ट्रपतीपदावर केली होती. राजाजी थोडे हिरमुसले झाले होते. परंतु, त्यांनी दोनच वर्षांमध्ये तत्कालीन मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच्या काळात मात्र पंडित नेहरूंची त्यांचे राजकीयदृष्ट्या फाटले आणि दुसऱ्या म्हणजे 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आसपास त्यांनी लोकशाही विषयक चिंतन एका दीर्घ निबंधातून मांडले. त्यामुळे अर्थातच त्यांनी नेहरू पंडित प्रणित काँग्रेसला विरोध केला होता.
रामचंद्र गुहा यांनी राजाजींचा याच लेखाचा हवाला देऊन सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर शरसंधान साधले आहे. त्यावेळी जर नेहरूंची राजवट ही एकारलेल्या दिशेने म्हणजेच निरंकुश दिशेने चालली होती, तर आज मोदींची राजवट यापेक्षा वेगळ्या दिशेने चाललेली नाही. ती अधिक घातक आहे, अशी रामचंद्र गुहा यांची मांडणी आहे…!!
आणि येथेच रामचंद्र गुहांच्या छद्मबुद्धीचा प्रत्यय येतो आहे. रामचंद्र गुहांना आज मोदींच्या राजवटीत राजाजींचा ऑगस्ट 1957 चा लेख आठवला. त्याचा संदर्भ आठवला… परंतु, 1957 नंतर 1990 च्या दशकापर्यंतची काँग्रेसची राजवट मात्र त्यांना आठवली नाही…!! 1957 नंतर जवळजवळ 4 दशके काँग्रेसचा एकछत्री अंमल होता, तेव्हा राजाजींनी दिलेला इशारा रामचंद्र गुहा यांना आठवला नाही. काँग्रेसच्या 4 दशकांच्या एकछत्री अमलात लोकशाही राजवट धोक्यात कधी आली नाही…!! विरोधी पक्षाला फार महत्त्व द्यावे, असे रामचंद्र गुहांना तेव्हा वाटले नाही. पण आज जेव्हा मोदींची राजवट सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेवर आली आहे, तेव्हा मात्र रामचंद्र गुहा यांच्यासारख्या प्रख्यात चरित्रकाराला आणि आणि त्यामुळे झालेल्या विचारवंताला 1957 मधला राजाजींच्या लोकशाही चिंतनाचे विशेष स्मरण झाले आहे…!! यालाच म्हणतात हुकमी विचारवंत स्मरण…!!… त्यासाठी विशेष कमावलेली बुद्धी लागते…!!
सनदी अधिकारी साहित्य संमेलनाध्यक्ष
हे म्हणजे असे झाले… लक्ष्मीकांत देशमुख आणि भारत सासणे हे दोन सनदी अधिकारी सेवेत असताना त्यांना महाराष्ट्रातली काँग्रेस प्रणित राजवट कधी अन्याय्य, छद्मबुद्धीची, लोकशाही प्रक्रियेला पायदळी तुडवणारी, असहिष्णू वगैरे वाटली नाही…!! परंतु सनदी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबरोबर ताबडतोब या सनदी अधिकारी साहित्यिकांना दिल्लीतली असहिष्णू राजवट, देशातले असहिष्णू वातावरण, छद्मबुद्धीचे राज्यकर्ते यांचा “साक्षात्कार” झाला…!! “राजा तू चुकतो आहेस”, असे ते म्हणायला लागले.
बारामती आणि दिल्ली
स्वतःच्या सनदी सेवेच्या अधिकार पदाच्या काळात “बारामतीची छद्मबुद्धी” महाराष्ट्रात कशी वावरत होती, हे या सनदी अधिकाऱ्यांना कधी दिसले नाही. त्याविरुद्ध एखादा “ब्र” शब्द त्यांनी कधी लिहिला नाही. उच्चशिक्षित भाषेत बोलायचे झाले, तर त्यांच्या साहित्यात “बारामतीच्या छद्मबुद्धी”चे प्रतिबिंब कधी उमटलेले दिसले नाही… पण बडोदा आणि उदगीर मध्ये साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उभे राहताच दूरच्या दिल्लीतली असहिष्णू, छद्मबुद्धी राजवट त्यांना लगेच दिसून आली…!! केवढी ही विलक्षण कमावलेली दूरदृष्टी…!!
नेमके हेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सनदी अधिकारी अध्यक्षांच्या दृष्टीचे आणि रामचंद्र गुहा यांच्यासारख्या चरित्रकार विचारवंतांचे दृष्टीतले छद्मबुद्धीचे विलक्षण साम्य आहे…!! किंबहुना मोदींच्या राजवटीत राजाजींचा लेख आठवणे म्हणजेच सनदी अधिकाऱ्यांच्या छद्मबुद्धी उसाशाची “रामचंद्री” इंग्रजी आवृत्ती छापणे होय…!!