वृत्तसंस्था
पुणे : पुणे, मुंबई हे प्रदूषणाचे हॉटस्पॉट्स असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. वायू-प्रदूषण आणि कोविड -१९ संक्रमण त्यांची एकमेकांशी सांगड असून तेच मृत्यूचे प्रमुख कारण बनल्याचे त्यांनी सांगितले. Pune, Mumbai pollution hotspots, researchers claim; Air pollution increased the death toll of Kovid-19
संपूर्ण देशात केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. विविध ठिकाणी प्रदूषण पातळी मोजली गेली. त्यात पीएम २.५ ( धुळीचे सूक्ष्म कण) उत्सर्जन भार असलेल्या प्रदूषित भागात राहणाऱ्या लोकांना कोविडचा संसर्ग जास्त होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष काढला आहे.
“वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण मोठे होते. या प्रदूषणाचा आणि कोविड -१९ च्या संसर्गाचा एकमेकांशी मोठा संबध आहे. त्यातूनच अनेक मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात पीएम २.५ उत्सर्जन भारतात दुसर्या क्रमांकाचे आहे. मुंबई आणि पुणेमध्ये हेच प्रमाण आहे. मानवाकडून होणारे प्रदूषण आणि हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवर भारतात पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५) झोन निश्चित केले. तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये
कोविड -१९ चा संसर्ग अधिक झाल्याचे उघड झाले.
अभ्यास कसा केला गेला?
मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील २.५ उत्सर्जन भार हा २०१९ या वर्षाचा पाया म्हणून घेतला. ३६ राज्यांतील १६ शहरांतून हे नमुने घेण्यात आले. नागपूर आणि चंद्रपूर वगळता मुंबई व पुणे यांची महाराष्ट्रातून निवड केली.
दहा बाय दहा किलोमीटर क्षेत्रात एका वर्षात विविध क्षेत्रातून किती सूक्ष्म कण ( पीएम २.५ )बाहेर पडतात. याचा सखोल अभ्यास केला. त्याचा आणि कोव्हिडशी संबंध आहे का हे पहिले गेले.
अभ्यासाचे निष्कर्ष
“वायू प्रदूषण आणि वरील श्वसन नलिकेमध्ये होणार संसर्ग यांच्यात परस्परसंबंध आहे”, असे पुणेकर न्यूजशी बोलताना लेखक सरोजकुमार साहू म्हणाले. “वायू प्रदूषण ही एक उत्प्रेरक आहे जी संक्रमणांना त्रास देते. “युरोपमधील अभ्यासातून असे दिसले आहे की इटली, जर्मनीसारख्या उच्च औद्योगिक क्षेत्रात कोविड -१९ रुग्णांची संख्या जास्त आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. इंधन जळते तेव्हा ते अर्धवट जळाल्यामुळे त्याचे सूक्ष्म धुली कण हवेत तरंगतात. पालापाचोळा जाळल्यानंतर जेवढे धूलिकण निर्माण होतात. त्यापेक्षा त्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात. शहरी भागात उद्योगधंदे अधिक आहेत. त्यामुळे तेथे प्रदूषण आणि त्याद्वारे निर्माण होणारे धूलिकण अधिक आहेत. त्यांचा आणि कोव्हिडचा संबध अधिक आहे.
प्रदूषणात उत्तर प्रदेशचा क्रमांक पहिला तर महाराष्ट्राचा दुसरा आहे. धुलिकणाची मात्रा वर्षाला ८२८.३ गिगाग्राम एवढी आहे. ५ नोव्हेंबर २०२०या कालावधीत महाराष्ट्रात १७.१९.लाख कोविड -१९ प्रकरणे नोंदली, जी देशात सर्वाधिक होती. “तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पीएम २.५ उत्सर्जन प्रति व्यक्तीच्या दृष्टीने महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशपेक्षा पुढे आहे,” असे डॉ साहू म्हणाले.
या अभ्यासात १६ शहरांपैकी मुंबई आणि पुण्यात अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक ‘खराब वायू गुणवत्तेचे दिवस’ नोंदले गेले. मुंबईत, एकूण १६५ दिवस वाईट हवेचे होते. त्याचप्रमाणे, पुण्यात एकूण ११७ दिवस खराब हवा होती. याच काळात मुंबईत २.६४ लाख कोविड -१९-रुग्ण आणि १०,४४५ मृत्यूची नोंद झाली, जी देशात सर्वाधिक होती. तर पुण्यात ३.३८ लाख कोविड -१९ रुग्ण आढळले तर ७ हजार ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रदूषणामुळे फुफ्फुसे झाली कमकुवत
प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळत गेली. विशेषतः महाराष्ट्रात हे चित्र दिसले. हीच प्रदूषित हवा फुफ्फुसात जाते. त्यामुळे फुफ्फुसे खराब होण्याचा धोका वाढतो. त्याच काळात कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने बाधित रुग्ण त्याचा सामना करण्यास सक्षम नसतो. कमकुवत फुफ्फुसावर पहिला आघात कोरोना विषाणूचा होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे, अशी माहिती हवेची गुणवत्ता,हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रकल्पाचे संचालक आणि संशोधक गुफ्रां बेग यांनी दिली. ते महाराष्ट्रातील हॉट स्पॉट असलेल्या शोधनिबंधाचे सह लेखकही आहेत.