शिस्त हा आपले ध्येय व ध्येयपूर्ती म्हणजेच यश यामधला पूल आहे. आपले आचार, विचार, वर्तन, संभाषण, संबध, कौटुंबिक व व्यवसायिक जीवन या सर्वात शिस्त हवीच. जे लोक यशाच्या उच्च शिखरावर पोहचले आहेत त्यांनी आयुष्यात शिस्तीला अति महत्व दिले आहे. शिस्तबद्धता हा यशस्वी व श्रीमंत व्यक्तींमधला सर्वोत्तम गुण आहे, शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते व ध्येय गाठण्यास मदत होते. त्यामुळे शिस्तीला आधी प्राधान्य द्या.Prioritize discipline first in life
त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला स्वत:ची ओळख बनवायची असेल, स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. त्यामुळे योग्य निर्णयक्षमता वाढीस लागेल. जे लोक स्वतःशी प्रामाणिक नसतात, त्यांचे करिअर, वैयक्तिक जीवन, प्रतिष्ठा यामध्ये संतुलन नसते. त्यामुळे यश प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. जीवनात मार्गक्रमण करताना नेहमी नवनवीन आव्हान स्वीकारा. डबक्यातले बेडूक डबक्यातच राहते ही म्हण नेहमी लक्षात ठेवा.
या म्हणीप्रमाणे तुम्ही बेडूक बनू नका. मी आहे त्यात सुखी आहे, उगाचच रिस्क का घेऊ? ही वृत्ती सोडा. नाहीतर एक दिवस पश्चातापाची पाळी येईल. जीवनात बदल घडवण्यासाठी आपल्या मनाने गुरफटलेल्या कोशातून बाहेर पडल्यावरच नवनवीन संधी दिसतील. आपला दर्जा नेहमी उच्च ठेवा, नाहीतर जगात तुमची किंमत काहीच राहणार नाही. श्रीमंत लोकांच्या जीवन शैलीकडे नेहमी आवर्जून पहा.
त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांचे वर्तन, संभाषण, फ्रेंड सर्कल हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळे त्यांना अधिक प्रतिष्ठा मिळालेली असते. ते स्वतःच एक ब्रॅंड असतात आणि ब्रॅंड है तो सबकुछ है। त्यामुळे आपला दर्जा उच्च असलाच पाहिजे. अर्थात प्रत्येक वेळी श्रीमंत लोकांकडेच पाहण्याची गरज नाही. जे लोक बुद्धीने हुशार असतात त्यांची राहणी सदैव साधी असते. अशी साधी राहणीदेखील अनेकदा महत्वाचे असते. अशा लोकांची विचार उच्च असतात. ते भपकेबाजपणाला काडीचेही महत्व देत नाहीत. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करतात आणि प्रगतीच्या दिशेने पावले टाकत राहतात.