1990 च्या दशकात मंदिर – मशीद आणि मंडल भोवती फिरणारे राजकारण वेगवेगळी वळणे घेत आता “भोंगे” आणि “बुलडोजर” यांच्या भोवती फिरू लागले आहे…!! एक प्रकारे प्रतिकांमधला हा बदल देशाच्या पक्षीय राजकारणाचा राजकारणाची बरीच वळणे आणि वसळे सांगून जातो…!!Politics of Symbols: Beyond the Cow – Gangajal – Temple “Bulldozer” is the symbol of law and order !!
फक्त धार्मिक प्रतिकांचे दूषण
1970 – 80 दशकात जनसंघ आणि भाजपला फक्त धार्मिक प्रतीकांच्या मुद्द्यावर राजकारण करणारा पक्ष म्हणून डिवचले जायचे. जनसंघ – भाजप कधी गाईचे प्रतीक वापरायचा, कधी गंगाजल… कधी राम मंदिराचे, कधी साधूंचे राजकारण करायचा. त्या पलिकडे विकासाचे मुद्दे जनसंघीय – भाजपायींना कधी सुचलेच नाहीत, अशी टीका भाजप विरोधक करत असत. त्या टीकेत तथ्य नव्हते असे नाही. कारण जनसंघ – भाजपाचे हिंदुत्वाचे विषय त्यावेळी खऱ्या अर्थाने मर्यादितच होते. जनसंघ – भाजपचे मूलभूत राजकीय अपील देखील विशिष्ट वर्ग पुरते मर्यादितच राहिले होते.
त्यापलिकडे जाऊन त्या काळात जनसंघ आणि भाजपचे नेते जरी व्यापक विचार करत होते तरी कृती करण्याची तशी राजकीय क्षमता पक्षाला प्राप्त नव्हती. मात्र गेल्या 4 – 5 दशकांमध्ये गंगा – यमुना – गोदावरी या नद्यांमधील बरेच “राजकीय पाणी” वाहून गेले. पण त्यातून हिंदुत्वाच्या राजकारणाची धारा कायम राहिली…!! पण गाय – गंगाजल – मंदिर ही जुनी प्रतिके मात्र पूर्णपणे बदलल्याचे आता दिसून येत आहे…!! एकेकाळी ज्या धार्मिक प्रतिकांच्या मुद्द्यावरून जनसंघी – भाजपायींना डिवचले जायचे, तो राम मंदिराचा मुद्दा भाजपने पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सोडवला. किंबहुना भाजपचे विरोधक या मुद्द्यावर त्याच्या जवळपासही फिरकू शकणार नाहीत अशा लेव्हल पर्यंत तो नेऊन ठेवला… हे करताना भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने आपल्या राजकीय कर्तृत्वाची नवी प्रतीके देखील तयार केली, ती निश्चित धार्मिकतेपलिकडची आहेत…!!
कल्याण योजना – कायद्याचा बडगा
संपूर्ण बहुमताची सत्ता मिळाल्यावर एकीकडे कल्याणकारी आणि पठडीच्या पलिकडे जाऊन भाजपच्या नेतृत्वाने अतिजनसामान्यांची जनधन खाती, किसान सन्मान, महिलांसाठी उज्ज्वला योजनेसारख्या लोकव्यापी योजना यशस्वी करून दाखवल्याच… पण कायद्याचा कठोर बडगा चालवणारे “बुलडोजर” सारखे प्रतिकही नव्याने “विकसित” केले आहे…!! जे भाजपच्या काय काँग्रेसी आणि कम्युनिस्टांच्या देखील पठाडीबद्ध राजकारणाच्या पलिकडचे आहे…!! किंबहुना भाजपच्या नव नेतृत्वाचे “नव प्रतीक” तयार करण्याचे हे यश आहे…!!
कायदेशीर बुलडोजर
आता भाजपचे विरोधक या बुलडोजर विरोधात कितीही उच्चरवाने धोशा लावोत… तो “कायद्याचा बुलडोजर” आहे हे मान्यच करावे लागेल…!! कारण उत्तर प्रदेशात किंवा मध्य प्रदेशात चाललेल्या बुलडोझरला कोर्टाची अधिमान्यता आहे. भाजपचे हातात पूर्ण बहुमताची सत्ता आल्यावर कायद्याचे राज्य किती बळकटपणे चालवून दाखवू शकतात त्याचे बुलडोजर हा प्रतीक ठरला आहे…!! नजीकच्या इतिहासात जे गुंड – माफिया गावागावांमध्ये आणि शहरांशहरांमध्ये सत्तेच्या बळावर आपली मस्ती आणि हेकडी चालवत होते त्यांना बुलडोजरच्या दहशतीने सरळ चालायला लावले आहे किंबहुना हातात दगड घेणाऱ्यांना बुलडोजरने गुडघ्यावर बसायला लावले आहे…!!
काँग्रेस, कम्युनिस्ट आणि अन्य प्रादेशिक पक्षांचे विरोधक बुलडोजरच्या प्रतिकाकडे कितीही द्वेषाने आणि त्वेषाने बघोत, हा बुलडोझर बऱ्याच जणांच्या मनात धडकी भरवतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. मिडियाने त्याला बाबा का बुलडोजर – मामा का बुलडोजर अशी नावे दिली आहेत.
दूषणे सहन करून नियमित काम
गाय – गंगाजल – मंदिर या प्रतिकांचे राजकारण करून देशात मर्यादित अर्थाने जागृती झाली, पण विरोधकांनी भाजपला दूषणेही लावली. ती बराच काळ सहन करावी लागली. त्याच दूषणांमध्ये राहून नियमित काम करीत राहिल्यानेच आज जुनी प्रतिके बाजूला ठेवून बुलडोजर सारखे बळकट प्रतीक तयार होऊ शकले आहे.
विरोधकांचे फक्त फ्रस्ट्रेशन
त्यामुळे विरोधक भाजपला हिणवू शकत नाहीत. ते फक्त त्रागा करू शकतात. शाब्दिक आदळआपट करू शकतात आणि आपले फ्रस्ट्रेशन मीडियात आणि सोशल मीडियात काढू शकतात…!! राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, असदुद्दीन ओवैसी, वृंदा कारत, राघव चढ्ढा दिग्विजय सिंग हे नेते म्हणून जरी स्वतंत्र असले तरी “फ्रस्ट्रेशन” नावाच्या प्रतिकाने ते एका समान धाग्यात गुंफले आहेत. “बुलडोजर” नावाच्या प्रतिकाचे हे राजकीय कर्तृत्व आहे…!!
प्रतिकात्मक मनसूबे उद्ध्वस्त
फ्रस्ट्रेशन आलेल्या नेत्यांच्या हातात ना त्यांची जुनी प्रतिके उरली आहेत, ना भाजपवर शरसंधान साधायला नवी प्रतिके मिळत आहेत…!! भाजप नव नेतृत्वाच्या “बुलडोजर” या कायद्याचा बडग्याच्या प्रतिकाने सर्व विरोधकांचे “प्रतिकात्मक” मनसूबे देखील खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त केले आहेत…!!