आपल्या शरीरातील इतर बऱ्याच अवयवांप्रमाणे आपल्या तोंडातदेखील असंख्य प्रकारचे जिवाणू असतात. दात, हिरड्या, जीभ, गालांची आतील त्वचा, टॉन्सिल्स, घसा या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंची एकप्रकारे वस्तीच असते. मात्र यातील बरेच जिवाणू तसे निरुपद्रवी असतात. दैनंदिन स्वच्छतेमध्ये रोजच्या रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात व्यवस्थितपणे घासले तर या जंतूंची संख्या नियंत्रणात राहते. साहजिकच जर मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले आणि दात रोज नीटपणे स्वच्छ केले नाहीत तर या जंतूंची संख्या अमर्याद वाढून मौखिक आरोग्य बिघडून जाते.Pay attention to oral health in a timely manner
साहजिकच दात किडणे, हिरड्या सुजणे असे विकार सुरू होतात. आपल्या तोंडात नित्यनेमाने लाळ पाझरत असते. या लाळेमुळे अन्नातील काही घटकांचे पचन होते आणि खाल्लेल्या घासाला द्रवरूप येऊन ते घशाकडे सरकवले जाते. तोंडातील जिवाणू विशिष्ट प्रकारची आम्ले निर्माण करतात. त्यांचा दातांवर परिणाम होऊन दातावरील वेष्टण कमकुवत होते.
.लाळेमुळे या आम्लांचे निष्क्रीयीकरण होते. वैद्यकीय औषधोपचारांमध्ये काही औषधांचा परिणाम होऊन आपल्या तोंडात स्त्रवणारी लाळ कमी होते. यामध्ये सर्दीची औषधे, वेदनाशामक औषधे, खाज किंवा ऍलर्जीसाठी वापरली जाणारी औषधे, मूत्राचे प्रमाण वाढवणारी डाययुरेटिक्स , नैराश्याावरील औषधे इत्यादींचा समावेश होतो. मधुमेह, एचआयव्ही अशा आजारांमध्ये रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते. अशा व्यक्तींमध्ये तोंडातील जंतूंमुळे दातांवर कमालीची सूज येते आणि दात, हिरड्या खूप जास्त सुजतात.
पेरीओडोंटायटीस नावाचा एक गंभीर त्रास उद्भवतो. या त्रासामधून काही दीर्घ स्वरूपाचे इतर गंभीर शारीरिक आजार निर्माण होतात. त्यामुळे अशा लोकांनी दोन ऐवजी तीनदा दात स्वच्छ धुतले तर त्याचा अधिक लाभ होतो. थोडक्यात आपण सगळ्या गोष्टींची व्यवस्थीत काळजी घेतो. त्याचप्रमाणे मौखित आरोग्याचीदेखील प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.