• Download App
    ममता आणि स्टालिन सोडले तर बाकी कोणत्या प्रादेशिक नेत्याची काँग्रेसवर दादागिरी करण्याची ताकद तरी उरलीय का??|No regional leader other than mamata and stalin has remained powerful to take on Congress over seat sharing in INDI alliance

    ममता आणि स्टालिन सोडले तर बाकी कोणत्या प्रादेशिक नेत्याची काँग्रेसवर दादागिरी करण्याची ताकद तरी उरलीय का??

     

    INDI आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 4 महाबैठका उरकून झाल्यानंतरही अजून त्यांच्यातले जागावाटप निश्चित होणे तर सोडाच, प्राथमिक बोलणीही सुरू झालेली नाहीत. पण तेवढ्यात प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबाव आणल्याचा बातम्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या आहेत. आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा खेचून घेऊन काँग्रेसला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर ढकळण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेस नेत्यांवर दबाव आणत असल्याच्या या बातम्या आहेत.No regional leader other than mamata and stalin has remained powerful to take on Congress over seat sharing in INDI alliance

    पण प्रत्यक्षात INDI आघाडीच्या 4 बैठका झाल्यानंतर काँग्रेसची अशी कोणत्याही प्रादेशिक नेत्याच्या दबावाखाली येण्यासारखी स्थिती तरी राहिली आहे का?? हा खरा सवाल आहे. कारण INDI आघाडीची चौथी दिल्लीतली बैठक झाल्यानंतर देशातली राजकीय परिस्थिती विशेषत: काँग्रेसची आणि प्रादेशिक पक्षांची परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे. या परिस्थितीची फारशी चर्चा माध्यमे करत नाहीत.



     नितीश – लालू दोघेही “गरजवंत”

    नितीश कुमार यांनी लल्लन सिंह यांना पक्षाध्यक्ष पदावरून बाजूला केल्यानंतर त्यांचे सरकार तूर्त वाचले असले, तरी प्रत्यक्षात नितीश कुमार यांची बाजू बिहारमध्ये आता लंगडी झाली आहे. लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर पुरती कुरघोडी केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी मनात आणले, तर ते केव्हाही नितीश कुमार यांना बाजूला सारून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यासाठी लालूप्रसाद यांना काँग्रेसची मदत मिळू शकते. किंबहुना काँग्रेसच्या मदतीची लालूप्रसाद यादव यांना गरज आहे. त्यामुळे नितीश कुमार अथवा लालूप्रसाद यादव हे काँग्रेसवर त्या अर्थाने दबाव आणण्याच्या स्थितीत नसून उलट तेच बिहारमध्ये “गरजवंत” झाले आहेत. काँग्रेसला बिहारमध्ये गमावण्यासारखे काहीही नाही.

     ठाकरे – पवारांच्या बेटकुळ्या

    महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपापल्या दंडातल्या राजकीय बेटकुळ्या कितीही उडवत असले, तरी प्रत्यक्षात त्यांचे पक्ष फुटल्याने आणि निवडून येण्याची क्षमता असणारे नेते त्यांच्या प्रतिस्पर्धी गटात गेल्याने त्यांची मूलभूत राजकीय ताकद फार घटली आहे आणि संजय राऊत किंवा सुप्रिया सुळे यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा वगळल्या, तर त्या दोन्ही पक्षांमध्ये खऱ्या अर्थाने जमिनीवर मैदानात उतरून लढण्याची ताकद बिलकुलच उरलेली नाही. त्या उलट काँग्रेस फुटलेली नाही. काँग्रेस आजही स्वतःची संघटनात्मक ताकद टिकवून आहे. शरद पवारांची वैयक्तिक विशिष्ट राजकीय प्रतिष्ठा टिकवून काँग्रेस नेते बोलत असले तरी प्रत्यक्षात पवारांची राजकीय ताकद किती घटली आहे, याची त्यांना पक्की जाणीव आहे. त्यामुळे ते राजकीय दृष्ट्या पवार आणि ठाकरे यांना बिलकुलच मोजत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकवणे ही काँग्रेसपेक्षा शरद पवारांची जास्त गरज आहे. उद्धव ठाकरे यांना मुंबईत काँग्रेस आणि वंचित आघाडीची गरज आहे. त्यामुळे ठाकरे आणि पवार यांचे नेते रोजच्या पत्रकार परिषदांमधून कितीही बडबड करत असले तरी प्रत्यक्षात हे दोन्हीही नेते काँग्रेसला आव्हान देण्याच्या बिलकुलच स्थितीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

    झारखंडमध्ये अवैध खाण घोटाळ्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन केव्हाही ईडीच्या जाळ्यात अडकून तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा प्रचंड खळबळ आहे. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची “आयडियेची कल्पना” मध्यंतरी चर्चेत होती, पण ती चर्चा आपल्याच अंगलट येते, असे पाहून हेमंत सोरेन यांनी ती गुंडाळून टाकली. पण काँग्रेस बरोबर टक्कर घेण्याच्या स्थितीत हेमंत सोरेन उरलेले नाहीत, ही त्यामुळे वस्तुस्थिती समोर आली.

     केजरीवाल कधीही आत

    दिल्ली आणि पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा जोर असला तरी स्वतः अरविंद केजरीवालाच आता ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. पक्षाचे 4 प्रमुख नेते आधीच तुरुंगात आहेत आणि त्या पाठोपाठ अरविंद केजरीवाल तुरुंगाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते केजरीवाल कधी आत मध्ये जात आहेत याची वाट पाहत आहेत. अर्थातच दिल्ली आणि पंजाब मध्ये ते आम आदमी पार्टीला जुमानण्याची शक्यता नाही. पंजाब मध्ये तर सगळ्या 13 लोकसभा जागा लढवण्याची तयारी करा, असे अशा सूचनाच काँग्रेसला दिल्या आहेत. अरविंद केजरीवालांची अटक आणि त्या पाठोपाठ आम आदमी पार्टी INDI आघाडीतून बाहेर या घटना आता अपरिहार्य आहेत. त्यामुळे केजरीवालांची पार्टी काँग्रेसवर दबाव आणून आपली दादागिरी चालवू शकण्याची सुताराम शक्यता नाही.

    त्या उलट काँग्रेसने तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाला हरवले आणि वाय. एस. शर्मिला यांचा YSRTP अर्थात वाय एस तेलंगण पार्टी हा पक्ष काँग्रेसने आपल्या विलीन करून घेतला आहे. ही घडामोड वर वर वाटते एवढी सोपी नाही. काँग्रेसने यातून दक्षिणेतल्या राज्यामध्ये स्वबळ वाढवले आहे आणि काँग्रेस जेवढी बळकट तेवढे INDI आघाडीचे घटक पक्ष दुर्बळ हे खरे राजकीय समीकरण आहे.

    अशा स्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत एम. के. स्टालिन हे दोन प्रमुख प्रादेशिक नेते वगळताINDI आघाडीतल्या बाकी कुठल्याच नेत्याची काँग्रेसला खऱ्या अर्थाने आव्हान देण्याची बिलकुलच ताकद उरलेली नाही. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू काँग्रेसची गरज नाही. पण या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती एवढी तळ गाठला आहे की, काँग्रेसला तिथे गमावण्यासारखे देखील काही नाही. त्यामुळे काँग्रेसवर प्रादेशिक पक्षांचे नेते दबाव आणतात, प्रादेशिक पक्षांचे नेते दादागिरी करतात अशा माध्यमांनी कितीही बातम्या दिल्या, तरी प्रत्यक्षात ममता आणि स्टालिन वगळता बाकी कोणत्याही प्रादेशिक नेत्याची काँग्रेसवर दबाव आणून आपल्याला जास्तीत जास्त जागा खेचून घेण्याची बिलकुलच राजकीय ताकद उरलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

    No regional leader other than mamata and stalin has remained powerful to take on Congress over seat sharing in INDI alliance

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी