केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. Nitesh Rane criticizes CM,admit it we don’t have the capacity
विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.
राणे म्हणाले, कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा.
केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती मिळावी सुद्धा. निसर्ग चक्रीवादळावेळी राज्य सरकारने 25 कोटींची मदत जाहीर केली. पण अजूनही एकही दमडी आली नाही. तसे यावेळी होता कामा नये. मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, पण ती मदत मिळेल असे मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
हा कसला पाहणी दौरा असा सवाल करून राणे म्हणाले, मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? मालवणमध्ये वायरी गावात लोक सकाळी सात वाजल्यापासून त्यांची वाट पाहात होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमिनीवर उतरले, त्याचा फायदा काय झाला आम्हाला? मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत. ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुळात याला दौरा म्हणू शकता का? मुख्यमंत्री एखाद्या भागात येतात तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा असतात. हे दु:ख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दु:ख पुसणारे नाहीत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात फिरत होते. मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा केला का? घराबाहेर पडून स्वत:च्या कपड्याची इस्त्री मोडू न देता ते परत घरी गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा असा दौरा कुणी पहिला नसेल, असेही राणे म्हणाले.