वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांनाही कोरोना प्रादूर्भाव झालेला असताना वैद्यकीय तज्ञ तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहेत. या तिसऱ्या संभाव्य लाटेत कोरोनाचा प्रादूर्भाव बालकांमध्ये होण्याची शक्यताही ते व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बालकांमधील संभाव्य कोविड प्रादूर्भावाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलावीत, असे पत्र राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी पाठविले आहे. NCPCR writes to Principal Secretaries/Secretaries of (Health) of all States/UTs requesting them to assign a nodal officer who would be responsible for providing data
सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात बालकांमधील कोविडचा संभाव्य प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत. राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांनी बालकांच्या आरोग्यासंबंधीचा डेटा अपडेट करावा. हा डेटा राज्य बालहक्क आयोग तसेच राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे शेअर करावा. आयसीएमआरने तयार केलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन आणि अंमलबजावणी करणे यामुळे सुलभ होईल. यासाठी प्रत्येक राज्याने एक जबाबदार नोडल ऑफिसर नेमावा.
तो राज्य आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगांच्या नियमित संपर्कात राहून वेळोवेळी सूचना आणि अंमलबजावणीबाबतचे आदान – प्रदान करेल, असे प्रियांक कानुनगो यांनी पत्रात नमूद केले आहे.
आयसीएमआरलाही पत्र
आयसीएमआरने बालकांमधील संभाव्य कोविड प्रादूर्भावाच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून ती राष्ट्रीय बालहक्क आयोगाला शेअर करावीत. ती राज्यांपर्यंत राष्ट्रीय बालहक्क आयोग पोहोचवेल, असे पत्र कानुनगो यांनी आयसीएमआरला देखील आधीच पाठविले होते.