वृत्तसंस्था
मुंबई – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या अर्थात एनडीआरएफच्या १०० पेक्षा अधिक टीम्स ५ – ६ संबंधित राज्यांच्या किनारपट्ट्यांवर तैनात करण्यात आल्या असून वादळात ० बळींचे टार्गेट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एनडीआरफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. More than 100 teams of NDRF have been deployed in 5-6 states,NDRF DG SN Pradhan
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना एनडीआरएफच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. जेथे गरज लागेल तेथे एनडीआरएफ अतिरिक्त २४ टीम्स तयार ठेवत आहे. या टीम्स ताबडतोब मदतकार्यासाठी तयार राहण्याच्या स्थितीत आहेत, अशी माहिती देखील प्रधान यांनी दिली.
गुजरातच्या किनारपट्टीवर उद्या पहाटे वादळ धडकणार आहे. तेथे वाऱ्याचा वेग १४५ ताशी किलोमीटर असेल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. त्या राज्यात कदाचित लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागेल. एनडीआरएफच्या टीम्सची त्याची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
या चक्रीवादळामुळे सध्या केरळ, गोवा, मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ गुजरातची किनारपट्टी और केंद्र शासित प्रदेश दादरा-नगर हवेलीच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. मुंबईत दुपारपासून जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह गोव्यात पाऊस आणि वेगवान वारे वाहात आहेत. या वाऱ्यांचा वेग जवळजवळ ताशी 60 ते 70 किमी प्रति तास आहे.
हे वादळ वेगाने पुढे सरकत असून आज रविवारी संध्याकाळी मुंबई किनारपट्टीजवळून गुजरातकडे सरकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित भागांत वेगवान वाऱ्यांसह मूसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीसह लगतच्या १५० किलोमीटर परिसराला पावसाने झोडपले आहे. मुंबई – ठाण्यानजीकच्या शहरांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.
किनारपट्टीवरील मोक्याच्या जागांवर लष्कर, नौदल, आणि तटरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित राहण्यासंबंधीचे मार्गदर्शन सुरू आहे. चक्रीवादळ उद्या पहाटे गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. तेथे वाऱ्याचा वेग सर्वाधिक ताशी १४५ ते १६५ किलोमीटर असेल. १७ आणि १८ तारखांना तेथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.