• Download App
    जुन्या जातीय बेरीज - वजाबाक्यांच्या जंजाळात अडकलेत मायावती आणि अखिलेश...!! Mayawati and Akhilesh Yadav caught in a fix of old caste combination politics of uttar Pradesh

    जुन्या जातीय बेरीज – वजाबाक्यांच्या जंजाळात अडकलेत मायावती आणि अखिलेश…!!

    मोदी – योगी जोडगोळीच्या नव्या राजकारणाला काटशह देणारे राजकारणातले नवे मुद्दे मायावती आणि अखिलेश यादव यांच्याकडे नाहीत. त्यामुळेच ते आपले राजकीय भवितव्य जुन्या जातीय समीकरणांमध्ये आणि बेरीज वजाबाक्यांमध्ये शोधताहेत. हे दोनही नेते त्यांच्या जुन्या जातीय राजकारणात अडकल्याने मोदी – योगी जोडगोळी आपला राजकीय मार्ग अधिक प्रशस्त करीत चालली आहे. Mayawati and Akhilesh Yadav caught in a fix of old caste combination politics of uttar Pradesh


    उत्तर प्रदेशातले 2022 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या चाललेले राजकारण पाहिले तर लेखाच्या शीर्षकाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कारण मायावती आणि अखिलेश यादव हे दोन माजी मुख्यमंत्री भाजपने टाकलेल्या सापळ्यात अडकलेत की काय?, असे वाटण्यासारखीच त्यांची राजकीय पावले पडताना दिसत आहेत.

    यात मायावती आघाडीवर आहेत. मायावतींनी आपला स्वतःचाच 2007 चा यशस्वी दलित – ब्राह्मण एकजुटीचा फॉर्म्युला पुन्हा एकदा आजमावायचे ठरवलेले दिसते. म्हणूनच त्यांचा जोर ब्राह्मण जातीय संमेलनांवर दिसतो आहे. पण कुठल्याही राजकारणामध्ये तेच तेच फॉर्म्युले फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत किंबहुना आजच्या भारताच्या वेगवान राजकीय प्रक्रियेत तर हे जुने घिसेपिटे फॉर्मुले मोठे अपयशच गळ्यात टाकण्याचा संभव दिसतो.

    परंतू मायावती आणि अखिलेश यादव यांचे राजकारण आपल्या स्वतःच्याच जुन्या जातीय समीकरणांच्या वळणावर चाललेले दिसत आहे. त्यामध्ये ते जातीय बेरीज करून आपल्या राजकारणाचे समीकरण “यशस्वी” करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु नेमके हेच सापळे भाजपने रचल्यासारखे वाटतात. मायावती आणि अखिलेश यांना जुन्या जातीय राजकारणात अडकवले की आपण नव्या पद्धतीचे राजकारण करायला मोकळे झालो असे आडाखे भाजपचे नेतृत्व बांधत आहे.

    2014 नंतर भारतीय राजकारणाने जी कूस बदलली आहे, ती पठडीबद्ध जातीय राजकारणाच्या कितीतरी पुढे निघून गेली आहे. यात मोदींच्या सर्वसमावेशक राजकारणाचा तर मोठा सहभाग आहेच परंतु त्याहीपलीकडे जाऊन भारतात नव्याने निर्माण झालेल्या आणि निर्णायक ठरलेल्या तरुणांच्या vote bank चा सगळ्यात मोठा वाटा नव्या राजकारणात राहिला आहे. या तरुणांच्या राजकीय विचारांमध्ये जात आणि धर्म हे घटक नसतातच अशी राजकीय अंधश्रद्धा बाळगण्याचे कारण नाही. परंतु नवीन आशा-आकांक्षा घेऊन पुढे चाललेली तरुण पिढी फक्त जात आणि धर्म या घटकांनाच आधार मानून राजकीय विचार करते आणि मतदान करते हे मानणे मात्र सर्वस्वी चूक आहे. ही चूक मायावती आणि अखिलेश यादव हे दोन्ही नेते करीत आहेत.

    2014 आणि 2019 या 5 वर्षांमधल्या सर्व निवडणुकांचे निकाल बारकाईने अभ्यासले तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या 2014 नंतर प्रत्येक निवडणुकीत वाढलेली दिसते. ही संख्या एकूण मतदारांवर प्रभाव टाकतानाही दिसते. आणि नेमकीच इथेच भारतीय राजकारणाने कूस बदलल्याची मेख दिसते. मोदींनी या नवीन तरुण मतदारांची राजकीय नाडी ओळखून त्याला प्रतिसाद दिला आहे. मोदींच्या अनुयायांनी त्याचे अनुकरण केले आहे.

    उत्तर प्रदेशात योगींचे राजकारण हे त्या दिशेने गेल्याचे पाच वर्षात दिसले. उत्तर प्रदेशातल्या राजकारणातले सगळे जुने जातीय ठोकताळे गेल्या पाच वर्षांमध्ये योगींनी बाजूला टाकून दिले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातल्या राजकारणाचा परिप्रेक्ष बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

    उत्तर प्रदेशचे राजकारण म्हणजे फक्त जातीय समीकरणे, यादव, दलित, ब्राह्मण, मुस्लिम, ठाकूर, बनिये या समाजघटकांची बेरीज – वजाबाकी, कोणत्या पक्षाकडे किती गुंड?, कोणत्या जिल्ह्यात कोणती जात प्रभावी?, कोणता धर्म प्रभावी?, याच आधारावर चालते असे विश्लेषण गेली किमान तीस वर्षे सुरू होते. त्यात अजिबात तथ्य नव्हते असे म्हणण्याचे कारण नाही. परंतु फक्त आणि फक्त वर नोंदविलेल्या निकषांवरच उत्तर प्रदेशाचे राजकारण फिरत होते हे मानणे देखील राजकीय अंधश्रद्धेचा एक भाग आहे.



    आणि म्हणूनच सध्या अखिलेश यादव आणि मायावती ज्या ब्राह्मण संमेलनांचा आधार घेऊन आपली “राजकीय भूमी” परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्यांचे राजकारण जुन्या पठडीतले आहे, असे म्हणावेसे वाटते. संपूर्ण देशाचे राजकारण आणि उत्तर प्रदेशाचे राजकारण जेव्हा ही पठडी ओलांडून पुढे गेले आहे तेव्हा त्यांनी मोदी – योगी जोडगोळीला खरे आव्हान ठरेल असे मुद्दे उपस्थित करायला हवे होते. मोदी – योगी ही जोडगोळी ज्या मुद्द्यांच्या आधारे राजकारण करते त्याला काटशह देण्याचे राजकारण मायावती, अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांनी करणे अपेक्षित होते. परंतु त्याऐवजी मायावती आणि अखिलेश यादव हे जुनेच पठडीबद्ध राजकारण करून उत्तर प्रदेशाला पुन्हा 1990 च्या दशकातल्या
    जातीय दलदलीत खेचून नेत आहेत, असा राजकीय युक्तिवाद भाजपला करणे शक्य होणार आहे. भाजपचा प्रचाराचा मुख्य भर या मुद्द्यावर राहण्याची शक्यता आहे.

    मात्र, याचा अर्थ असा नाही की योगींची राजवट १००% निर्दोष आणि संपूर्णपणे उत्तर प्रदेशातल्या जनतेचे समाधान करणारी ठरली आहे. त्यात उणीव मोठी आहे.

    परंतु एक वस्तुस्थिती मात्र नक्की आहे की योगींनी गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशातल्या राजकारणाचा बाज असा काही बदलून टाकला आहे की मायावती आणि अखिलेश यांच्यासारख्या विरोधकांना नवे मुद्दे सापडवताना पंचाईत होते आहे. ज्या जातीय समीकरणांच्या आणि परंपरागत गुंडगिरीच्या आधारावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आपले राजकारण रेटून करत होते, त्या जातीय समीकरणांना आणि गुंडगिरीला योगींनी नख लावले आहे. दोन्ही पक्षांच्या प्रभावक्षेत्रात घुसून तिथली गुंडगिरी समूळ उघडण्याचा प्रयत्न योगींनी यशस्वी करून दाखवला आहे.

    अतीक अहमद, मुख्तार अन्सारी, विकास दुबे यांच्यासारख्या गुंडांवर कायदेशीर कारवाईचा दंडा चालवून योगींनी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या राजकारणाचा आधारच नष्ट केला आहे. या दोन्ही पक्षांना आणि काँग्रेसला देखील आपले राजकारण पुन्हा उभे करायचे असेल तर नवा पाया, नवे मुद्दे घेऊनच उभे राहावे लागेल अन्यथा त्यांच्या पदरात अपयश येणे अपरिहार्य आहे. ही वेळ योगींनी त्यांच्यावर आणली आहे.

    एकीकडे मोदींचे नवे सर्वसमावेशक राजकारण आणि दुसरीकडे योगींचा राजकीय गुंडगिरीवर जीवघेणा प्रहार या राजकारणाला काटशह देणारे राजकारण कोणी यशस्वी करणार असेल तरच योगींवर मात करता येऊ शकेल अन्यथा अपयशाचा धोका मोठा आहे. तो अखिलेश आणि मायावती यांनी नीट ओळखलेला दिसत नाही.

    त्यातही पुन्हा “अखिलेश यादव यांना पाहायला कशी गर्दी होते आहे.”, “मायावतींच्या ब्राह्मण संमेलनांना कसा प्रतिसाद मिळतो आहे” यांची भरभरून विश्लेषण करणारे पत्रकार दोन्ही नेत्यांचे “फुगे” हवेत उंच उंच उडवत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या नव्या राजकीय वास्तवाचे त्यांचे भान सुटले आहे. म्हणूनच ते पुन्हा फक्त आणि फक्त जातीय समीकरण, बेरीज – वजाबाकी यामध्येच आपल्या राजकारणाचे भवितव्य शोधताना दिसत आहेत. आणि हाच खरा भाजपचा सापळा आहे…!!

    Mayawati and Akhilesh Yadav caught in a fix of old caste combination politics of uttar Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!