विनायक ढेरे
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो तरुणांनी तुरुंगवासात कष्ट भोगून, हौतात्म्य पत्करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा”, ही त्यांची प्रेरणा होती. या स्वातंत्र्यसैनिकांना अनेक स्फूर्तिगीतांनी स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची प्रेरणा दिली होती. ही स्फूर्तिगीते लिहिणारे लेखकही महान क्रांतिकारक, समाज सुधारक, आणि राजकीय धुरिणच होते. Marathi inspiring poems of freedom movement
वेगवेगळ्या काळात लिहिली गेलेली ही स्फूर्तिगीते आजही समाजाला नवचैतन्य देतात. काळाच्या ओघात जुन्या स्फूर्तिगीतांची जागा नव्या स्फूर्तिगीतांनी घेतली आहे. “वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम”ची जागा “माँ तुझे सलाम” ने घेतली आहे. दोन्हीकडे प्रेरणा सारखीच आहे… पण जुनी स्फूर्तिगीते ही प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात उतरलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी लिहिली होती.
त्यामुळे त्यांच्या लिखाणाला प्रत्यक्ष कृतीचे अधिष्ठान होते. त्यामुळेच ही स्फूर्तिगीते कायम अजरामर राहिलीत. भले ती आज विस्मरणात गेली असतील, पण त्यांची मूलभूत चेतना कधीच विस्मृत होणार नाही. अशीच ही काही विस्मरणात गेलेली स्फूर्तिगीते भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी वाचा!!