नाशिक : महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्याची चर्चा; पवार + ठाकरे (Pawar+Thackeray) घराणेशाहीचे कुंपण ओलांडू देईनात!! असेच म्हणायची वेळ या चर्चेतल्या नावांच्या संकुचित परिघाने आणली आहे.
दररोज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्राच्या पूरोगामीत्वाची जपमाळ ओढणाऱ्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने आत्तापर्यंत महाराष्ट्राला कुठली महिला मुख्यमंत्री मिळू दिली नाही. प्रतिभाताई पाटील, प्रभा राव वगैरे नावांची चर्चा काँग्रेस मधून समोर आली. पण पुरोगामीत्वाची टिमकी वाजवणाऱ्या कॉंग्रेसी संस्कृतीच्या नेत्यांनी त्यांना संधी मिळू दिली नाही. पण आता जेव्हा आपापल्या घराण्यांमधली महिलांची नावे राजकारणात पुढे रेटायची वेळ आली, तेव्हा मात्र महाराष्ट्रात काँग्रेसी आणि “पवार बुद्धी”च्या इकोसिस्टीमने महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार??, याची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेला पुरोगामीत्वाचा मुलामा दिला.
त्या चर्चेत काँग्रेसच्या मुंबईतल्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भर घातली. खुद्द वर्षा गायकवाड या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्याही स्वतः घराणेशाहीच्या प्रतिनिधित्वापासून वेगळ्या नाहीत, पण त्यांनी महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा करताना सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत व्यक्त केले.
दिल्लीत दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवालांच्या राजकीय नाड्या सुप्रीम कोर्टाने पूर्ण आवळल्यानंतर त्यांना राजीनामा देणे भाग पडले. त्यांनी देखील लालू – राबडी फॉर्म्युला राबवून सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री करायचा डाव रचून आम आदमी पार्टीत घराणेशाही रेटण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याच्या बातम्यांची भरमार होऊन त्या अंगावर आल्याने “डमी मुख्यमंत्री” म्हणून त्यांनी आतिशी मार्लेना यांना नेमले. आतिशी संदर्भात माध्यमांनी बातम्या देताना देशात 16 महिला मुख्यमंत्री यांनी कसे कर्तृत्व गाजविले, याची रसभरीत वर्णने केली!! त्यातला एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी सगळ्या महिला घराणेशाहीच्या प्रतिनिधी होत्या, हे सत्य मात्र बातम्यांमधून लपविले गेले.
महाराष्ट्रात देखील ज्यावेळी शरद पवारांचा राजकीय वारसा नेमका कुणाकडे जाणार??, याविषयीच्या अटकळी बांधल्या जाऊ लागल्या, त्यानंतर सुप्रिया सुळे यांचे नाव पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून “पवार बुद्धी”च्या इकोसिस्टीमने पुढे करायला सुरुवात केली. खुद्द पवारांनी स्वतःहून त्यांचे नाव पुढे केले नसल्याचे दाखविण्यात इकोसिस्टीम आघाडीवर राहिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यावेळी देखील त्यांच्या ऐवजी मुख्यमंत्री पदाची सूत्रे अन्य कुणाकडे सोपवायची चर्चा झाली, त्यावेळी बाकी कोणापेक्षा रश्मी ठाकरे यांचे नाव इकोसिस्टीमने पुढे आणले.
– ठाकरे – पवारांमध्येच जुंपून दिली
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या दोघींची नावे घेऊन आपल्या पक्षातल्या नेत्यांना पेचात आणले. वास्तविक काँग्रेसमध्ये घराणेशाहीच्या प्रतिनिधी असल्या तरी अनेक महिला नेत्या आहेत. काँग्रेस श्रेष्ठींनी मनात आणले, तर महाराष्ट्राला काँग्रेसची कुठलीही महिला नेता मुख्यमंत्री म्हणून मिळू शकते. परंतु, काँग्रेस श्रेष्ठींच्या राजकीय हिशेबात बसत नसल्याने आतापर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. पवारांचा पक्ष फुले शाहू आंबेडकरांचा तोंडी जप करत आपली घराणेशाहीच पुढे रेटत राहिला. त्यातूनच सुप्रिया सुळेंचे नाव इकोसिस्टीम मार्फत पुढे आणले गेले. आता त्यात ठाकरे घराण्यातल्या सुनबाई रश्मी ठाकरे यांचे नाव वर्षा गायकवाड यांनी पुढे आणून भर घातली. असे करून त्यांनी ठाकरे आणि पवार यांच्यातच जुंपून दिली असेही काही लोक बोलत आहेत, पण ते काही असले, तरी पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा; पवार आणि ठाकरे घराणेशाही ओलांडू देईनात!!, ही वस्तुस्थिती बदलली किंवा लपली नाही.
Lady chief minister issue; why limited to pawar + thackeray dynasty politics??
महत्वाच्या बातम्या
- Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कुणाचीही हिंमतच होईना!!
- Hockey : चिनी भूमीवर चीनवर मात करून भारत हॉकीत एशियन चॅम्पियन; ऑलिंपिकचे तिकीट निश्चित!!
- Adani Green Energy : अदानी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र सरकारला 6600 मेगावॅट वीज पुरवेल