- स्थानिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठी वाढ
- -25 ग्रामपंचायती ताब्यात, ग्रामपंचायतीत 1182, नगरपालिकेत 320, महापालिकांमध्ये 59 सदस्य संख्या
विशेष प्रतिनिधी
कोची : केरळमध्ये बरीच वर्षे राजकीय पायरोवा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भाजपने स्थानिक स्तरांवरच्या निवडणुकीत दखल घेण्याजोगे यश मिळविले आहे. केरळमधील डावी आघाडी आणि काँग्रसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी यांच्या राजकीय संघर्षात आणि राज्यातील हिंसक राजकारणात तुलनेने कमकुवत असणाऱ्या भाजपने स्थानिक स्तरांवरच्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समित्या, नगर पालिका आणि महापालिका या निवडणुकीतील लोकप्रतिनिधींच्या संख्येत चांगली वाढ केलेली दिसते.
राजधानी तिरूअनंतपूरम महापालिकेत डावी आघाडी आणि काँग्रेस आघाडीला जबरदस्त टक्कर देताना भाजप प्रणित एनडीएने ३४ जागा मिळवत काँग्रेस आघाडीला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. अंतिम निकालात डावी आघाडी ५१, एनडीए ३४ तक काँग्रेस आघाडी १० जागांवर विजयी झाली आहे.
याचाच अर्थ भाजप सध्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होण्याच्या दिशेने दमदार वाटचाल करताना दिसतो आहे. भाजपचे माजी अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांच्या महत्त्वाकांक्षी पंचायत टू पार्लमेंट या मोहिमेचे केरळमध्ये यश दिसण्यास सुरवात झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येत वाढ झाली असून भाजपने 25 ग्रामपंचायती आणि 2 नगरपालिका अनुक्रमे पल्लकड आणि पंडलम ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी ट्विट करून दिली.
एलडीएफ आणि काँग्रेसप्रणित युडीएफला जोरदार टक्कर देऊन भाजपप्रणीत एनडीएने हा विजय संपादन केला. भाजपचे ग्रामपंचायतीत 1182 सदस्य, पंचायत समितीत 37, जिल्हा परिषदेत 2, नगरपालिकेत 320, महापालिकेत 59 सदस्य निवडून आले आहेत. त्याशिवाय तिरूअनंतपुरम महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप उदयास आला आहे. ही राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी दिसते आहे.