जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते. पाय जड होतात, हातांचे चाळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो, म्हणजेच ताणाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. हे केवळ प्रौढ व्यक्तींच्याच बाबतीत घडते असे नाही.Keep the brain active by removing the constant stress immediately
मुलांनादेखील विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. ज्या प्रकारच्या तणावामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात, असे तणाव नेहमीच नकारात्मक असतात. असे तणाव कोणाहीवर वारंवार येत असतील तर त्याचा आधी मेंदूवर आणि कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे.
पण समजा तो आलाच तर त्याचा वेळीच निचरा होईल हे देखील पाहिले पाहिजे. कारण ताणाने अनेक समस्यांची सुरुवात होते ती वेळीच थांबवणे गरजेचे असते. तणावाच्या वेळेस काही व्यक्ती येरझाऱ्या घालतात, असे आपण पाहिले असेल. ताणाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते.
ताण हलका होतो. ताण आलाच तर त्याचा योग्य पद्धतीने निचराही झाला पाहिजे. मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या व न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्पर राहील. मात्र रोजच्या जगण्या-वागण्यात आपण काही गोष्टी पूर्णत: टाळू शकत नाही. अशा वेळेला त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता येईल.