विशेष प्रतिनिधी
भोपाळ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात बसूनच कारभार हाकत असताना शेजारच्या मध्य प्रदेशात “घरी बसायची” आणि “घरातून बाहेर काढायची” दोन आजी – माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसते. आपला पारंपरिक मतदारसंघ छिंदवाडातील रॅलीत माजी मुख्यमंत्री कमलनाथ थोडे इमोशनल झालेले दिसले. kamal nath – shivraj singh chauhan takes a jibe at each other
त्यांनी, “थोडी विश्रांती घ्यायची माझी तयारी आहे. मला आता कोणत्याही पदाची अभिलाषा उरलेली नाही. मला आधीच खूप काही मिळालेले आहे. माझी आता घरी बसायची तयारी आहे.” असे उदगार काढले. ते लगेच खूप व्हायरल झाले. राज्यात कमलनाथांच्या रिटारयमेंटच्या चर्चेला ऐन थंडीत जोरदार गरम हवा मिळाली.
शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे आमदार फोडून सरकार बनविले. फुटलेले आमदार निवडून बहुमतही मिळविले. अशा स्थितीत पराभूत झालेल्या कमलनाथांनी इमोशनल होऊन वरील उद्गार काढल्याचे बोलले गेले.
पण त्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही तसेच राजकीय चिमटा काढणारे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही काही कोणाला विश्रांती अथवा निवृत्ती घ्यायला भाग पाडलेले नाही. कोणाला विश्रांती घ्यायची असेल तर ती त्यांची वैयक्तिक इच्छा आहे. त्यांनी त्यावर जरूर विचार करावा.”
kamal nath – shivraj singh chauhan takes a jibe at each other
असे उद्गार काढून शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथांच्या राजकीय पराभवाच्या दुःखावर फुंकर घातली की त्यांच्या जखमेवर हलकेच मीठ चोळले, याचीही गरमागरम चर्चा सुरू झाली आहे.