राष्ट्रवादीचे खासदार, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केल्याने महाराष्ट्रात वादळ उठले आहे. या वादळाच्या अनेक पैलूंचे वेध घेणारे अनेक लेख ‘द फोकस इंडिया’ प्रकाशित करत आहे. त्यापैकी हा महत्त्वाचा लेख…Just playing the role, not the exaltation of Nathurama .
गिरीश लता पंढरीनाथ
(ज्येष्ठ पत्रकार)
माझा मुद्दा वेगळा आहे.
कुणी कोणती भूमिका करावी, अथवा करु नये हा ज्याचा त्याचा मुद्दा…
अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली.
गोगा कपूर यांनी कंसाची भूमिका साकारली.
गांधी या सिनेमात नथूराम गोडसेची भूमिका हर्ष नय्यर यांनी साकारली.
नीतीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली.
माझा एक मुद्दा असाही आहे की, कलाकार म्हणून एखादा एखादी भूमिका साकारत असेल तर त्याचा त्याच्या व्यक्तिमत्वावर किती प्रभाव पडू शकतो ?
इश्वराला रिटायर करा म्हणणारे डॉ श्रीराम लागू यांनी एका चित्रपटाच्या शेवटी देवळात जाऊन देवाच्या मुर्तीपुढे नतमस्तक होताना अनेक चित्रपटांत दिसले आहेत. आता नेमका चित्रपट कोणता तो आठवत नाही.
सकाळी सकाळी ज्येष्ठ पत्रकार समर खडस सरांची पोस्ट पाहिली. त्यामध्ये शेवटी ते म्हणतात की,
“अमोल कोल्हेंनी केलेल्या नथुरामाच्या भूमिकेबाबत कलावादी भूमिका घेणाऱ्या तमाम मित्रांना गोरख पाण्डेयंची ही कविता समर्पित. कोल्हेंनी नथुरामाची भूमिका केली त्यात चूक काहीच नाही. कोल्हे नथुरामाची वैचारिक भूमिका मान्य करतात किंवा कसे ते त्यांनी स्पष्ट केल्यास वादाचं काही कारण उरणार नाही. तितकं ते लवकर करतील ही अपेक्षा!!”
मला ही भूमिका पटतेय कारण अरविंद त्रिवेदींनी रावणाची भूमिका केली म्हणून त्यांनी कुठल्या सीतेचं अपहरण केलं नाही, ना गोगा कपूर यांनी आपल्या भाच्याची हत्या करण्यासाठी कुणाला सुपारी दिली नाही. हर्ष नय्यर यांच्याबद्दलही काही कुठे ऐकायला-वाचायला मिळालं नाही.
याच्या उलट आता बघूयात श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या नीतीश भारद्वाज यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक हजार लग्ने केली नाहीत. ना रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी कुठल्या शंबुकाची हत्या केली.
लोक शरद पोंक्षे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची तुलना करतात ती मला गैरवाजवी वाटते ती यासाठी की, शरद पोंक्षे हे सातत्याने नथुरामाचे उदात्तीकरण आणि गांधीहत्येचे समर्थन करण्यासाठी ओळखले जातात. पोंक्षेंच्या लेखी गांधींची हत्या ही हत्या नाहीच तर तो वध आहे. अशा प्रकारच्या विचार करणाऱ्यांचा शंभर टक्के विरोधच करायला हवा.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच सदर भूमिका ही आपल्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे नमूद केले आहे. परंतु तरीही त्यांना एक सल्ला आवर्जून द्यावा वाटतो तो म्हणजे, या देशातील जनता कलाकारांच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असते. एका ठराविक साच्याच्या बाहेर ती कलाकारांना पाहूच शकत नाही. ती कलाकारांवर प्रचंड प्रेम करते, तेवढाच तिरस्कारही करु शकते. तुम्ही त्यांचं प्रेम मिळवा, तिरस्कार मिळविण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका लोकांपुढे मांडायला हवी. जर ही भूमिका करुन चूक झाली असं वाटत असेल तर प्रसंगी अतिशय निर्मळपणाने लोकांची माफी देखील मागावी. शेवटी तुमचे दर्शक, चाहते हे तुमचे मायबाप आहेत. ते तुम्हाला समजून घेतली.
बाय द वे,
पीपल्स हो, तुम्ही माझ्यावरही टिकाटिपण्णी आणि वेगवेगळी लेबलं लावायला स्वतंत्र आहात.