आज 14 ऑगस्ट भारतासाठी विभाजन विभीषिका दिवस. या दिवशी 1947 मध्ये अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाच्या देशाची निर्मिती झाली. या निर्मितीने प्रचंड विध्वंस झाला आणि म्हणूनच भारत 14 ऑगस्ट हा विभाजन विभीषिका दिवस म्हणून पाळतो. का झाले हे विभाजन?? कोणी केले ते?? कोण कारणीभूत ठरले त्याला?? त्यामुळे झालेला संहार टाळता आला नसता का?? त्याची कारणमीमांसा आणि जेष्ठ – श्रेष्ठ विचारवंतांनी, राजकीय नेत्यांनी केली आहे.India’s partition criminals : Gandhi, Nehru, Patel, Azad, read it from Dr. Rammanohar Lohia and Acharya Atre
त्यापैकीच महत्त्वाची कारणमीमांसा करणारे दोन दिग्गज म्हणजे समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. डॉ. लोहिया आणि अत्रे हे दोन्ही नेते रूढार्थाने हिंदुत्ववादी नव्हते. पण ते हिंदूद्वेषीही नव्हते. म्हणूनच भारतीय फाळणीच्या त्यांनी केलेल्या कारणमीमांमासेला विशेष महत्त्व आहे.
डॉ. राममनोहर लोहिया यांनी आपल्या मृत्यूपूर्वी काहीच दिवस आधी एक ग्रंथ लिहून हाता वेगळा केला होता, त्याचे नावच मुळी “भारतीय फाळणीचे गुन्हेगार” हे होते. पण या ग्रंथ प्रकाशन आधीच डॉ. लोहिया दिवंगत झाले आणि नंतर त्यांच्या समाजवादी साथींनी एकत्र येत हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
डॉ. राममनोहर लोहिया यांनी भारतीय फाळणीची अष्ट कारणमीमांसा केली. त्यांच्या मते 1. ब्रिटिशांचे कपट 2. काँग्रेस नेत्यांचे उतार वय 3. हिंदू – मुसलमान दंग्यामुळे उद्भवलेली परिस्थिती 4. जनतेत दृढतेचा आणि सामर्थ्याचा अभाव 5. गांधीजींची अहिंसा तत्त्वाचा अतिरेक 6. मुस्लिम लीगचे फुटीर धोरण 7. संधी येईल तेव्हा तिचा फायदा घेण्याची भारतीयांची असमर्थता आणि 8. हिंदूंचा अहंकार ही ती 8 कारणे होत!!
आपण सर्वसामान्य भारतीय ज्या महान नेत्यांना स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणतो, त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद या काँग्रेस नेत्यांना डॉ. लोहिया आणि आचार्य अत्रे यांनी भारतीय फाळणीसाठी जबाबदार धरले आहे.
या संदर्भात लोहिया म्हणतात :
भारताच्या स्वातंत्र्यासाठी फाळणी अनिवार्य आहे ही गोष्ट नेहरूंनी मनाशी ठरवून टाकले होते. 1946 मध्ये त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत हे उघड झाले होते आणि तोच हवाला मी देतो. पूर्व बंगालमध्ये आहे काय?? नुसते पाणी, दलदल आणि जंगल. तुला आणि मला जो हिंदुस्थान माहिती आहे, तो हा हिंदुस्थान नाही असे ते त्यावेळी म्हणाले होते. याचा अर्थ हिंदुस्थानच्या मुख्य भूमीपासून पूर्व बंगाल अलग करायची त्यांची तीव्र इच्छा आहे, असे मला त्या दिवशी दिसले. ही गोष्ट मला विलक्षण वाटली. नेहरू भावना विवश होऊन बोलत होते. पण त्यांनी मनाशी अगोदरच काहीतरी ठाम निर्णय केला होता. अर्थात नेहरूंनी फाळणीसाठी त्यावेळी उघडपणे मान्यता दाखवली नव्हती किंवा ती गांधीजींनाही कळू दिली नव्हती. फाळणी अनिवार्य आहे, हे त्यांनी मान्य केल्यामुळेच ते पूर्व बंगाल भौगोलिक कारणासाठी भारतापासून वेगळा करायला तयार झाले होते.
हे पुढारी म्हातारे झाले होते. थकलेही होते. आपले अखेरचे दिवस ते मोजीत होते. निदान फाळणी पत्करताना आपल्या उतार वयाचा विचार त्यांच्या मनात प्रभावी होता. सत्तेच्या खुर्ची शिवाय ते अधिक दिवस जगणे शक्यच नव्हते. इतकी वर्षे आयुष्य लढण्या – झगडण्यात घालवल्यावर आता हे पुढारी जीवनात निराश होऊ लागले होते. पण त्यांचे नेते महात्मा गांधी त्यांना परिस्थिती अनुरूप वागू द्यायला फारसे तयार नव्हते. काँग्रेस नेते मनोदुर्बलतेचे बळी झाले होते. काँग्रेस वर्किंग कमिटीचे मुकाटपणे अनेकांनी फाळणीच्या योजनेस मान्यता देऊन टाकली होती. देशाच्या ऐक्याचा बळी देऊन स्वातंत्र्य विकत घ्यायला हे नेते तयार झाले होते आणि माझ्यासारखे काही जण त्याला दुबळा विरोध करत होते.
गांधीजींना रामाप्रमाणे ईश्वराचे अवतार बनविले जाईल, यात काडीमात्र शंका नाही. पण विभाजनाबाबतच्या त्यांच्या दोषांचे अधिक सविस्तर अध्ययन व्हावयास पाहिजे. अन्य सर्वकाही अपयशी झाले, तरी देखील गांधीजींचा फाळणीविरुद्धचा संकल्प असफल व्हायला नको होता. पण तो झाला ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. भारतीयांची स्वातंत्र्यकांक्षा स्थिर आणि जिवंत राखण्यात, बुद्धीनिष्ठ तर्क करण्यात गांधीजी आजोड होते. पण ती इच्छा त्यांनी संघटित केली नाही. तसे करू शकणारे मदतनीसही त्यांच्याजवळ नव्हते. त्यांची स्वतःची तऱ्हा आणि पद्धत त्या इच्छेला संघटित स्वरूप देण्याच्या दृष्टीने फारशी उपयुक्तता नव्हती.
गांधीजींनी एकापाठोपाठ एक कितीतरी संघटना उभ्या केल्या. त्यांनी चरखा संघ बनविला. ग्रामोद्योग संघ, तालीमी संघ, हरिजन संघ, आदिम जाती संघ अशा विधायक संघटना उभारल्या. पण त्यापैकी कोणत्याच संघटनेने स्वातंत्र्यकांक्षेला बलशाली केली नाही. जास्तीत जास्त लोकांना कामात गुंतवणाऱ्या या संस्था. आळस आणि निराशा या विरुद्ध एखाद्या कवचासारखा त्यांचा उपयोग होत असेल पण त्या संघटनांनी स्वातंत्र्य इच्छेला शक्तिशाली बनविले नव्हते ही देखील वस्तुस्थिती आहे.
देशविभाजनाच्या विरोधातील लढाईत गांधीजी एकाकी राहिले.
आचार्य अत्रे यांनी मात्र या संदर्भात प्रस्तावनेत आणखी वेगळे परखड मत व्यक्त केले आहे.
आचार्य अत्रे म्हणतात :
आमच्या मते गांधीजींचे राजकारण विशिष्ट मर्यादेपर्यंत जरी लढाऊ असले, तरी ते क्रांतिकारक राजकारण नव्हते हेच फाळणीचे खरे कारण होय. लढ्याच्या दडपणाचा उपयोग करून घेऊन इंग्रज साम्राज्यवाद्यांशी सौदेबाजी करणे हेच गांधीवादी राजकारणाचे तंत्र होते. आणि पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद हे सर्वजण त्याच तंत्राचे पुरस्कार होते. म्हणून राष्ट्राची फाळणी व्हायला त्या सर्वांना सारख्याच प्रमाणात जबाबदार धरले पाहिजे. डॉ. लोहियांच्या पुस्तकात गांधीजींवरील श्रद्धा आणि नेहरूनवरील राग यांचा परिणाम त्यांच्या विवेचनावर झालेला आहे, असे आम्हाला वाटते.
पण फाळणीमुळे भारतामधला हिंदू – मुस्लिम तेढीचा अथवा इतर कोणताही प्रश्न न सुटता, ते सर्व प्रश्न अधिक बिकट झाले, या डॉ. लोहियांच्या विवेचनाशी कोणत्याही सुबुद्ध माणसाचे दुमत होणार नाही.
डॉ. लोहिया आणि आचार्य अत्रे हे रूढार्थाने हिंदुत्ववादी नेते नव्हेत. उजव्या राष्ट्रवादाचा त्यांनी कायम विरोध केला. पण त्यांनी केलेली फाळणीची कारणमीमांसा मात्र अधिक वास्तवावर आधारित होती, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही
India’s partition criminals : Gandhi, Nehru, Patel, Azad, read it from Dr. Rammanohar Lohia and Acharya Atre
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात तिरंगा रॅलीचा उत्साह, पुलवामाच्या मेरी माटी मेरा देश यात्रेत हजारो लोकांची गर्दी
- जेनेरिक औषधी न लिहिल्यास डॉक्टरांचे परवाना होणार निलंबित, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नवीन नियमावली
- श्रीराम ग्रुपच्या संस्थापकांनी दान केले तब्बल ₹ 6 हजार कोटी; क्रेडिट स्कोर न पाहता लोन देतो ग्रुप
- चोरडियांच्या बंगल्यात अजितदादांची “गुप्त” भेट घेतल्यानंतर पवारांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात मोदींवर शरसंधान!!