मुंग्यांच्या लांबच लांब रांगेचे आपणास कायमच अप्रूप वाटत असते. कधीही पाहा, मुंग्या रांग न मोडता शिस्तीत आपले काम करीत असतात. त्याचप्रमाणे त्या एकदा का अन्न सापडले की शातंपणे, अविरतपणे एका दिशेने त्या कार्यरत राहतात. लहानपणापासून आपल्याला त्याचे मोठे अप्रूप वाटत असते. मुंगीला अन्नापासून वारुळापर्यंतचा रस्ता कसा काय सापडतो. एकाच रांगवेरून त्या कशा काय वारूळाकडे चालत राहतात याची अनेकदा आपल्याला नेमकी माहिती नसते. पण यामागेदेखील विज्ञान दडलेले आहे असे तुम्हाला सांगितले तर धक्का बसेल.How do ants get disciplined in a row?
पण हे खरेच आहे. याचे कारण म्हणजे मुंगी ही माणसाप्रमाणेच समाजप्रिय आहे. अन्नाच्या शोधासाठी मुंग्या गटाने वारुळातून बाहेर पडतात. सुरुवातीला कामकरी मुंग्या अन्नासाठी बाहेर पडतात. एकदा का मुंगीला अन्नाचा साठा मिळाला की ती त्याचे सॅम्पल घेऊन धावत वारुळाकडे परत फिरते. या वेळी मात्र ती तिचे पोट आणि स्टिंग जमिनीला घासत घासत येते. यामुळे आपण पेनने जशी रेषा काढतो अगदी तशाच प्रकारची रेषा जमिनीवर तयार होते. आणखी मजेशीर बाब म्हणजे जेव्हा स्टिंग जमिनीवर घासली जात असते, तेव्हा त्यातून ट्रायल फर्मोन नावाचे रसायन बाहेर सोडले जाते.
अशा प्रकारे ही मुंगी अन्नाच्या ठिकाणापासून ते वारुळापर्यंत अदृश्य अशी रसायनांची रेष आखते. वारुळात येताच अन्नाची शहानिशा होते आणि अनेक कामकरी मुंग्या त्या रेषेवरून अन्नापर्यंत पोहोचतात. परतताना त्यादेखील अशीच रेष मारतात. यातून एक अदृश्य राजमार्गच आखला जातो आणि त्यावरून शेकडो मुंग्या ये-जा करतात. मुंग्यांनी सोडलेले रसायन लगेच उडून जाते.
त्यामुळे रसायन सोडण्याची प्रक्रिया प्रत्येकीकडून सतत सुरू असते. अर्थात हा मार्ग सोडला तर भरकटण्याची भीती मुंगीला कायम सतावत असते. त्यामुळेच ती रांग सोडण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे जेव्हा एखादवेळी मुंगी रांग सोडते त्यावेळी ती भरकटताना सैरभैर धावताना तुम्हाला दिसते.