• Download App
    होळी अर्थात हुताशनी पौर्णिमा सणामागील शास्त्र; अशी करा होळीची पूजा!!Happy Holi festival means hutashani pornima science

    Happy Holi : होळी अर्थात हुताशनी पौर्णिमा सणामागील शास्त्र; अशी करा होळीची पूजा!!

    प्रतिनिधी

    नाशिक : फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेने दिली आहे. Happy Holi festival means hutashani pornima science

    – प्रथेप्रमाणे साजरी केली जाते होळी

    यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हा सण नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. मात्र ज्या ठिकाणी प्रशासनाचे सर्व नियम पाळून होळी सण साजरा करता येईल. त्या ठिकाणी नेहमीच्या प्रथेप्रमाणे हा सण साजरा करू शकतो.

    – तिथी : देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

    – समानार्थी शब्द : उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.

    – धार्मिक कथा

    `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावले. त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली.’ – भविष्यपुराण

    एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पाहता क्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.

    फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.

    – होलीचे महत्त्व :

    विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण : ‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ – प.पू. परशराम पांडे महाराज

    होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.

    – होळी सद्गुण ग्रहण करण्याची /अंगीकारण्याची संधी आहे.

    – उत्सव साजरा करण्याची पद्धत : देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते.

    – होळीची पूजा अशी करावी…

    प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ

    अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.

    निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय

    अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.

    – होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

    अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।

    अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

    अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.

    होळीच्या दुसर्या दिवशी करायच्या धार्मिक कृती

    प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।

    कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥

    वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

    अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.

    (काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी येणार्या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)

    होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

    वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।

    अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

    अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.

    होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !

    भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात, असे वरील श्लोकांत आलेच आहे.

    आयुर्वेदानुसार होळीचे लाभ

    थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

    ही एक प्रकारची पूजाच

    होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र – हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. ‘होळीच्या दिवशी अश्लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातात. याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असताना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? होळीच्या दिवशी बोंब मारताना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहे. दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एक प्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा.

    Happy Holi festival means hutashani pornima science

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!