सध्या सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर लोकं स्वतःचे फोटो टाकत असतात. कधी आपण इतरांपेक्षा किती सुंदर, फिट आहे त्याचं, कधी आपल्याला इतरांपेक्षा किती जास्त फॉलोअर आहेत याचं, कधी आपल्या मोठ्या पार्टीज चं, कधी आपल्याकडे असणाऱ्या गाडी, बंगला इत्यादी भौतिक गोष्टींच तर कधी आपण इतरांपेक्षा किती जास्त आनंदी आणि सुखी आहोत याचं. जेव्हा आपण तुलना करत असतो, तेव्हा कदाचित आपण एक घोटाळा करत असतो.habit of comparing yourself to others
तो म्हणजे, इतरांमधल्या सगळ्यात बेस्ट गोष्टीची तुलना कदाचित आपण आपल्यातल्या त्या मानाने सुमार गोष्टीशी करत असतो. हे असं झालं की माश्याच्या पोहण्याची तुलना त्याच्या झाड चढण्याच्या क्षमते सोबत करणे किंवा डावखुरे असतांना उजव्या हाताने एखादे वाद्य वाजवण्याची तुलना करणे. जरी इतरांच्या तुलनेत आपण जास्त चांगल असावं, असं वाटणं हे नैसर्गिक असलं तरी असं नेहमी तुलना करून आपण स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखून स्वतःच नुकसान तर करत नाही आहोत, हे बघितलं पाहिजे.
इतरांबरोबर ची तुलना ही दुसरं तिसरं काही नसून आयती-वायती दुःखाची रेसिपी असते. या तुलनेमुळे अजून काय होतं? समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा एखादी गोष्ट जास्त चांगली जमते. या गोष्टी मुळे तुम्हाला त्याच्याबद्दल खूप ईर्ष्या वाटते आणि मग त्याच्यातली ती चांगली गोष्ट आपल्याला यावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण त्या व्यक्तीला कमी लेखण्यासाठी किंवा त्याला मागे खेचण्यासाठी आपली शक्ती खर्च करत असतो. असं करून स्वतःहून नकारात्मकता ओढवून घेत असतो.
यापेक्षा जर स्वतःची तुलना स्वतःशीच केली की काल मी जे होती, होतो किंवा आज जे आहे त्यापेक्षा उद्या अजून चांगल कसं स्वतःत बदल घडवून स्वतःत सुधारणा करू शकेल. तर यामुळे तुमची शक्ती आणि सगळे प्रयत्न फक्त तुम्हाला स्वतःला अजून चांगली व्यक्ती होण्यासाठीच खर्च होतील आणि ज्याचा तुम्हालाच फायदा होईल. आणि स्वतःला टेन्शन फ्री, आनंदी ठेवण्यासाठी देखील मदत होईल.