विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : वॉरक्लॉ (पोलंड) येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या तिरंदाज मिहिर अपार, याच स्पर्धेत सहभागी झालेला प्रथमेश जवकार व प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे बुलडाणा शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
शहरात नागरिकांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केले. चांदीच्या रथातून या तिघांचीही भव्य मिरवणूक डीजेच्या तालात काढली. जयस्तंभ चौकात आमदर संजय गायकवाड यांनी शाल, पुष्पगुच्छ व फेटा बांधून त्यांचे भव्य स्वागत केले.
मिहिर अपारने या जागतिक स्पर्धेत कंपाऊंड या तिरंदाजी प्रकारात सांघिक सुवर्ण पदक प्राप्त केले. तर युवा कॅडेट गटात प्रथमेश जवकार याने सहभागी होवून भारताचे प्रतिनिधित्व केले. पोलंड येथे गेलेल्या संपूर्ण भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या चंद्रकांत इलग यांचीही रथातून मिरवणूक काढली.
जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, तहसील चौक, एचडीएफसी चौकामार्गे शिक्षक कॉलनी या ठिकाणी या मिरवणूकीची सांगता झाली. मिरवणूकीदरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री सातपुते, उपमुकाअ राजेश लोखंडे, संजय चोपडे यांनी या तिघांचेही पुष्पहार घालून अभिनंदन केले.
- मिहिर अपारला तिरंदाजीत सुवर्णपदक
- पोलंड येथील जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत यश
- प्रथमेश जवकार, प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचेही स्वागत
- चांदीच्या रथातून या तिघांचीही भव्य मिरवणूक