विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्व लोकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी गोवा सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गोव्यात आता सर्व खाजगी रुग्णालयांत कोरोनावर मोफत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.GOA: Free treatment for corona in private hospitals in Goa, CM Pramod Sawant announces
गोवा सरकारने राज्यातील २१ खासगी रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोनावरील उपचारांचे अधिकार आता आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगी रुग्णालयात आता सरकारच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात खासगी रुग्णालयांकडून काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे गोवा सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करत राज्यातील खासगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असं म्हटलंय.
मुख्यमंत्री सावंत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “गोव्यातील जनतेच्या हितासाठी, कोव्हिड रूग्णांच्या उपचारांसाठी राज्य सरकार खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवेल. सरकार यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात अधिकाऱ्यांची नेमणूक करेल तसंच दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजनेतील लाभार्थ्यांना १००% मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.
देशातील सर्वात लहान गोवा राज्यात कोरोनामुळे स्थिती खालावत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रूग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.
दरम्यान गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे कोणत्याही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे.