मानवी प्रज्ञेचा विकास कसा होतो याबाबत इंग्लंडमधील इंपीरिअल कॉलेजमधील मायकेल जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत जुळ्या भावंडांवर झालेल्या संशोधनातून बुद्ध्यांकाचा विकास होण्यात जनुकांचा सहभाग असतो ही बाब शास्त्रज्ञांनी सिद्ध केली आहे. याद्वारे मानवी प्रज्ञेच्या विकासास कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं. मानवी बुद्धिमत्तेच्या विकासास कारण ठरणाऱ्या चाळीस जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला.Genes play a major role in the development of human intelligence
सुमारे साठ हजार व्यक्ती व वीस हजार बालकांवर झालेल्या आजवरच्या जगातील सर्वांत मोठ्या संख्याशास्त्रीय संशोधनातून हुशारीचं मूळ असलेल्या जनुकांचा शोध लागला. मानवी मेंदूच्या विकासात मज्जापेशींची वाढ होऊन अदमासे साडेतीन पौंड वजनाच्या मेंदूची वाढ व मेंदूतील विविध अभिक्रियांचा विकास कसा होतो व त्यासाठी कुठली जनुकं कारण असतात यावरील संशोधनातून मेंदू व बुद्धिमत्तेच्या विकासासाठी चाळीस जनुकं कारण असल्याचं या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं.
उंदरांवर केलेल्या प्रयोगात बुद्धिमत्ता विकासासाठी आवश्यक असणारी जनुकं निष्प्रभ करून उंदरांच्या बुद्ध्यांकावर होणाऱ्या परिणामाच्या निरीक्षणातून बुद्धिमत्तेच्या विकासासाठी या चाळीस जनुकांचा सहभाग असल्याचं सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं. या जनुकांच्या प्रभावामुळे मानवातही बुद्ध्यांकात फरक पडत असल्याचं स्पष्ट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मानवी प्रज्ञेच्या विकासात जनुकांचा थेट संबंध बुद्ध्यांकाशी असल्याचं स्पष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं.
जनुकांद्वारे बुद्ध्यांकात पाच टक्क्यांपर्यंत फरक पडू शकत असल्याचं या संशोधनातून पुढे येत आहे. बुद्ध्यांकाच्या वाढीत जनुकीय सहभाग असल्याचं सिद्ध होत आहे. जनुकीय संरचनेबरोबर पोषक वातावरणाचा बुद्धिमत्तेच्या विकासात १५ ते २० टक्के सहभाग असल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं. या संशोधनाद्वारे मानवी मेंदूच्या जडणघडणीविषयक उपलब्ध माहितीचा वापर मज्जासंस्थेतील अनेक विकारांवर मात करण्यासाठी होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या वापरातून भविष्यात बुद्धीसंबंधी जनुकांत बदल घडवून एक प्रगल्भ बुद्ध्यांक असणारी नवी पिढी निर्माण करता येणं शक्य होणार आहे.