आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात
संजय लीला भन्साळी आणि हुसैन झैदींवर बदनामीचा खटला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई:गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच प्रर्दशित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, आलिया भट्ट गंगुबाईच्या भूमिकेत आहे. मात्र, या चित्रपटाने गंगुबाईच्या कुटुंबियांना त्रासात टाकलं आहे. त्यांच्या कुटुंबाला आता लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागत असून, आता गंगुबाईच्या दत्तक मुलाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे.GANGUBAIKATHIYAWADI CONTROVERSY
नातेवाईकांकडून सातत्याने टोमणे आणि बोलणी ऐकावी लागत असल्यानं गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाने संजय लीला भन्साळी आणि पुस्तकाचे लेखक हुसैन झैदी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.
या प्रकरणाबद्दल गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबाचे वकील म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून संपूर्ण कुटुंबच धक्क्यात आहे. गंगुबाई यांचं व्यक्ती चरित्र ज्याप्रमाणे दाखवण्यात आलं आहे. ते पुर्णपणे चुकीचं आणि निराधार आहे. हे पूर्णपणे अश्लील आहे. एका सामाजिक कार्यकर्तीला वेश्या म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यांना लेडी माफिया डॉन बनवण्यात आलं आहे”, वकील नरेंद्र म्हणाले.
“आपल्याकडे जर घराच्या अब्रूलाच हात घातला जात असेल, तर लोक त्याविरुद्ध बोलण्याऐवजी मुलालाच पुरावे मागतात. आम्ही हे कनिष्ठ न्यायालयात सिद्ध केलं आहे. मात्र, आता आमच्या प्रकरणावर सुनावणी होत नाहीये,” असं वकिलांनी सांगितलं.
आमचा लढा २०२० पासून सुरू झाला. जेव्हा त्यांच्या (गंगुबाई काठियावाडी) मुलाला कळलं की, पुस्तक आलं आहे आणि चित्रपट तयार केला जात आहे. जेव्हा चित्रपटाच्या प्रोमोसोबत त्यांच्या आईचे फोटो बघितल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळाली. सध्या कुटुंब स्वतःची ओळख लपवत आहे. कधी अंधेरी, तर कधी बोरिवली अशा ठिकाणी स्थलांतरित होत आहे.”
“नातेवाईक त्यांना (गंगुबाईच्या मुलाला) वाईटपणे संबोधत आहे. तुमची आई खरंच वेश्या होती का? तुम्ही तर त्या सोशल वर्कर होत्या असं सांगत होते, असं ओळखीतील लोक म्हणत आहे. जेव्हापासून हे सुरू झालं आहे, तेव्हापासून कुटुंबियांची मानसिक स्थिती नीट नाही. त्यांना (गंगुबाईचा मुलगा) १९४९ मध्ये दत्तक घेण्यात आलं होतं. आम्ही संजय लीला भन्साळी आणि हुसैन झैदी यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही,” असं वकिलांनी सांगितलं.
गंगुबाईंचे दत्तक पुत्र बाबुराव शाह ‘आजतक’शी बोलताना म्हणाले, “माझ्या आईला वेश्या बनवून ठेवलं आहे. माझ्या आईबद्दल लोक आता काहीही बोलत आहे. मला ते चांगलं वाटत नाही. चित्रपट निर्मात्यांनी पैशाच्या हव्यासापोटी माझ्या कुटुंबाला बदनाम करून टाकलं आहे. हे अजिबातच स्वीकारण्यासारखं नाहीये. त्यांनी कुटुंबियांची परवानगीच घेतली नाही. पुस्तक लिहिण्यापूर्वीही नाही आणि चित्रपट बनवण्यापूर्वीही नाही,” असं बाबूराव शाह यांनी सांगितलं.
गंगुबाई यांची नातीनेही नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या आजी कामाठीपुऱ्यात राहायची. मग तिथे राहणारी प्रत्येक बाई वेश्या झाली का? माझ्या आजीने चार मुलांना दत्तक घेतलं होतं. ती मुलं वेश्यांची होती. माझ्या आईचं नाव शकुंतला रंजित कावी, दुसऱ्या मुलाचं नाव रजनीकांत रावजी शाह, तिसऱ्या मुलाचं नाव बाबू रावजी शाह आणि चौथ्या मुलीचं नाव सुशीला रेड्डी आहे. आम्ही त्यांच्याच कुटुंबातील आहोत. आम्हाला दत्तक घेतलं गेलं, तेव्हा कायदा नव्हता,” असं भारती म्हणाल्या.
“आम्ही अभिमानाने आमच्या आजीबद्दलचे किस्से सांगायचो. चित्रपटाच्या ट्रेलर आल्यापासून आमच्या अब्रूच्या चिंधड्याचं उड्याल्या आहेत. लोक फोन करून तुमची आजी तर वेश्या होती, असं बोलत आहेत. माझ्या आजीने तिथे वेश्यावस्तीतील महिल्यांच्या कल्याणासाठी काम केलं. आम्हाला लोक वेश्येची मुलं म्हणून बोलत आहे”, असंही त्या म्हणाल्या.