वृत्तसंस्था
मुंबई : राज्यातील कारागृहात बंदी असलेल्या महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
राज्यातील महिला कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत. अनेकदा क्षुल्लक प्रकरणात कोठडीची शिक्षा होते. जामिन मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असतो. मात्र नक्की काय करायला हवे? कुठल्या प्रकारे अर्ज करावा? याची माहिती नसल्याने, पुरेशी आर्थिक स्थिती नसल्याने तसेच काही तांत्रिक मुद्दयांमुळे अशा महिलांना जामिन मिळत नाही. अशी प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवून या महिला कैद्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभाग कोणती भूमिका बजावू शकतो, याबाबत मंत्रालयात बैठक घेतली, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.
कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येईल. या दृष्टीने संबंधित विभागांची मदत घेतली जाईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
– महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ अभियान
– कारागृहात अनेक महिला कच्चे कैदी आहेत
– क्षुल्लक प्रकरणात महिलांना कोठडीची शिक्षा
– सुटकेबाबत महिलांना करणार प्रबोधन