कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात सध्या विविध प्रयोग व संशोधन सुरु आहे. त्यातील काही संशोधने उत्साहवर्धक निष्कर्ष मांडू लागले आहेत. अशाच एक नव्या संशोधनात दोन प्रकारच्या प्रतिपिंडांचा वापर करून केलेले उपचार कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे प्राथमिक संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी याबाबत उंदरांवर प्रयोग केला आहे.Experiment of two antibodies against corona is effective
शास्त्रज्ञांनी वेगवेळ्या प्रकारे प्रतिपिंड एकत्र करून कोरोना विषाणूविरोधात त्याची चाचणी घेतली असून तयार होणारे औषध उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वॉशिंग्टन वैद्यकीय विद्यापीठातील संशोधकांनी विविध प्रकारच्या उपचार पद्धतींची चाचपणी केली. यानुसार, दोन प्रतिपिंडांचा वापर करून तयार केलेले औषध उपयुक्त असून ते कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करते, असे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उंदरांवर प्रयोग केले. कोरोना विषाणूच्या आतापर्यंत आढळून आलेल्या सर्व प्रकारांवर हे औषध उपयुक्त ठरत आहेत. तसेच, नव्याने निर्माण होणाऱ्या विषाणूंविरोधातही ते कसे काम करते, याचा अभ्यास केला जाईल, असे संशोधकांनी सांगितले. प्रयोगशाळेत तयार केलेली प्रतिपिंडे ही शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या प्रतिपिंडांप्रमाणेच असतात. मात्र, प्रतिपिंडे शरीरात तयार होण्याचा वेग कमी असल्याने कृत्रिमरित्या तयार केलेली प्रतिपिंडे अधिक प्रभावीपणे आणि वेगाने कोरोना विषाणूविरोधात काम करतात,
असे शास्त्रज्ञांनी सांगितले. या साठी शास्त्रज्ञांना उंदरांवर असा प्रयोग केला. शास्त्रज्ञांनी अल्फा, बिटा, गॅमा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांची चाचणी घेतली. त्यानंतर त्यांनी उंदरांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांचा अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये इंजेक्शनद्वारे प्रतिपिंडे सोडली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शरीरात विषाणू सोडला गेला. यानंतर उंदरांचे सहा दिवस निरीक्षण करण्यात आले आणि नंतर त्यांच्या शरीरातील शिल्लक असलेल्या विषाणूंचे प्रमाण मोजण्यात आले. यावेळी दोन प्रकारची प्रतिपिंडे शरीरात सोडलेल्या उंदरांमध्ये विषाणूविरोधात लढण्याची क्षमता अधिक निर्माण झाल्याचे आढळून आले.