काही तरुण गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाविषयी अति-आत्मविश्वास असतो. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत अनेक संधी असल्याने त्यांना नवी नोकरी सहज मिळेल, असे त्यांना वाटते. पैसे राखून ठेवावेत, असे भविष्यात कोणतेच संकट त्यांना दिसत नसल्याने ते सढळ हाताने खर्च करतात.Donot overdo it with overconfidence
खर्च केल्यानंतर हातात उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा आधीच पैसे वेगळे काढून ठेवलेले बरे. त्याचप्रमाणे काही जण फारच बेफिकीर असतात. बँक स्टेटमेंट नसलेले, डिव्हिडंड चेक न भरलेले, टॅक्स रिटर्न्स न भरलेले, तसेच म्युच्युअल फंड वा ब्रोकरकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले असंख्य तरुण आढळतील.
कंपनीचा आग्रह असतो म्हणून त्यांच्याकडे पॅनकार्ड तरी असते. गंमत म्हणून शेअरचे व्यवहार करणारेही अल्पकालीन भांडवली नफा कमावतात आणि तो करपात्र असतो. हा कर न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. आपण पकडलेच जाणार नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे एका लिफाफ्यात स्टेटमेंट, बिले, कागदपत्रे व नोटिसा ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा त्याचे वर्गीकरण करावे. वेळेवर कर भरावा. या सवयी वेळेवर व लवकर रुजवल्या तर पुढील वाटचालीत मदत होईल.
सॅलरी अकाउंटमधून थेट पैसे वळते करण्याचा पर्याय असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे पैसे नियमितपणे गुंतवले जातात आणि बचत खात्यात विशिष्ट रक्कम जमा झाली की त्याचे रूपांतर ठेवींमध्ये केले जाते , या पर्यायांमुळे शिस्तबद्ध बचत होऊ शकते.