नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशन काळात फडणवीस सरकारला अडचणीत आणायची संधी विरोधकांना पुरती साधता आली नाही, पण अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरायची संधी मात्र विरोधकांना आयती मिळाली. पण ती भाजपच्या मंत्र्यांच्या कारनाम्यांच्या मुळे नाही, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांच्या मंत्र्यांच्या कारनाम्यांच्या मुळे विरोधकांना ती साधता आली. Devendra fadnavis
एकनाथ शिंदेंचे मंत्री वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत आले. संजय शिरसाट यांच्या घरी नोटांनी भरलेली बॅग आढळली तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याआधी अशाच मंत्र्यांच्या गेस्ट हाउस मध्ये नोटा आढळल्या. शंभूराज देसाई यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली. त्या आधी प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे अडचणीत आले.
त्यांच्यापाठोपाठ अजित पवारांच्या मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेताना फडणवीस सरकारने वेळ लावला. त्याचे राजकीय दृष्ट्या दुष्परिणाम झाले. त्यांच्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे स्वतः अडचणीत सापडले त्याचबरोबर सरकारची प्रतिमा मलिन करण्यात त्यांचा हातभार लागला. आता तर विधिमंडळात जंगली रम्मी खेळण्याचे प्रकरण बाहेर आले. त्यावर खुलासा करताना माणिकराव कोकाटे यांची बरीच राजकीय धावपळ झाली.
याच दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातला भांडणाचे रूपांतर थेट मारामारीत झाले त्यामुळे सगळ्याच आमदारांची प्रतिमा मलिन झाली सगळे आमदार माजलेत, असे लोक बाहेर बोलतात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत बोलावे लागले.
– उद्धव ठाकरे + शशिकांत शिंदेंचा सल्ला
या सगळ्या प्रकरणांमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होते म्हणून मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला. देतो त्यांनी या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मंत्र्यांमुळे फडणवीसांची स्वतःची अब्रू जाते आहे, असा टोमणा मारायची संधी पवारांच्या राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना मिळाली.
– फडणवीसांना खरी संधी
पण या सगळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्रिमंडळाची “सफाई” करण्याची संधी मिळाली आहे. फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये एवढी खिचडी झालेली नव्हती कारण त्यावेळी शिवसेनेचे पाच सहा मंत्री वगळता बाकीचे सगळे मंत्री भाजपचे होते एकनाथ खडसेंचे जमीन प्रकरण वगळता बाकी कुठल्या प्रकरणाने फडणवीस सरकारला राजकीय त्रास दिला नव्हता. विरोधकांना तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैयक्तिक बोट दाखवायची संधीही मिळाली नव्हती. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला मराठा आरक्षणाचा मुद्दा पडद्याआडुन पुढे करावा लागला होता. त्या राजकीय परीक्षेत फडणवीस शरद पवारांना पुरून उरले होते.
आता मात्र फडणवीसांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात राजकीय खिचडी झाली. भाजपचे अजित पवारांना महायुतीत सामावून घेण्याचे धोरण यासाठी कारणीभूत ठरले. पवार नावाचे “पॉलिटिकल एलिमेंट” जिथे जाते, तिथे ते मित्र पक्षांना त्रास देते. आतापर्यंत फक्त काँग्रेसला अनुभव होता, आता तो भाजपला यायला लागलाय. पण या समस्येचा काट्याचा नायटा होण्यापूर्वी फडणवीसांनी ती निस्तरली तर ठीकच, अन्यथा यापुढे अधिक त्रास वाढवून ठेवला आहे.
– शिंदे + अजितदादांच्यात विरोध करायची हिंमत नाही
अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांमुळे फडणवीस अडचणीत येणे ही खुद्द त्यांच्यासाठी “सफाई”ची संधी आहे. डाग लागलेले कुठलेच मंत्री आपल्या मंत्रिमंडळात नकोत, अशी भूमिका फडणवीसांनी आता घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही त्यांना विरोध करण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्यात तेवढी ताकद नाही. त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला, तर भाजपचे केंद्रीय नेते त्यांना एका क्षणात गप्प बसवू शकतात. त्यांच्यापुढे जाण्याची या दोन्ही नेत्यांची हिंमत नाही. त्यामुळे फडणवीस “सफाई”ची संधी केव्हा घेतात आणि “सफाई” कशी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Devendra fadnavis has real opportunity to reshuffle his cabinet
महत्वाच्या बातम्या
- बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…
- India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार
- Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले
- पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!