मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. अश्या अनिश्चिततेचा अनुभव आपण सर्व जण कोरोनाच्या काळात घेत आहोत.
भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात मृत्युपत्र, इच्छापत्रं म्हणजेच विल करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्ते मधील आपला अविभक्त हिस्सा देखील मृत्युपत्र द्वारे देता येतो.
अजूनतरी इच्छामरणासंदर्भातील इच्छापत्र करण्यासाठी स्वतंत्र कायदा नाही. देहदान, नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास हॉस्पिटल मध्ये वेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात त्याचा उपयोग करावा, तसेच मृत्यूपश्चात अंत्यसंस्कार करायचे कि नाही हे मृत्युपत्रात लिहून उपयोगाचे नाही कारण माणसू गेल्यावर मृत्यूपत्र शोधण्याची ती वेळ नसते. त्यामुळे ह्या गोष्टींची पूर्व कल्पना आपल्या हयातीतच प्रत्येकाने जवळच्यांना द्यावी.
मृत्युपत्र करण्याआधी आपल्या सर्व स्थावर घर, जमीन इत्यादी आणि जंगम एफ डी, रोकड, बँक खाते, शेअर्स, दागिने इ. मिळकतीची यादी करावी. हे काम वेळ खावू आहे हे आपल्या लक्षात येईल. मृत्युपत्र हे लेखी असणे गरजेचे आहे. मृत्युपत्राची भाषा ही सोपी आणि सुटसुटीत असावी. कोणाला काय द्यायचे ह्या बरोबरच एखाद्याला का काही द्यायचे नाही, हेही सुस्पष्ट लिहावे. Death is certain, but its timing is the most uncertain, so the will is important
मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही.
शक्यतो साक्षीदार हे आपल्यापेक्षा कमी वयाचे असल्यास अधिक उत्तम. मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टर चे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगले. या बाबी नीट करून जर वेळीच मृत्यूपत्र बनविले तर तुमच्या संपत्तीतील पैसा चुकीच्या पद्धतीने कर्च होणार नाही आणि वायाही जाणार नाही.