आपण कोणाशी तरी संवाद साधत आहोत ही फार सुखद अशी भावना असते. बोलणाराचे आणि ऐकणाराचे एक प्रकारचे नाते जोडले जात असते. प्रत्यक्ष समोरासमोर बोलणे होत असणे जास्त चांगले. बोलायला मिळणे आणि आपले कोणी तरी ऐकून घेणारे आहे ही भावनाच मुळी फार सुख देणारी असते. त्यामुळे आपण सतत बोलण्यापेक्षा कधी तरी समोरच्याचे ऐकून घेणेदेखील फार आवश्यक असते. त्यासाठी ऐकण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे.Connect the listening organ to the personality
आपल्या व्यक्तीमत्वाचा तो एक घटक केला पाहिजे. शब्द जे कानावर पडत असतात ते आपल्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान घेऊन असतात. त्याचे आकलन करून त्यातील योग्य तो अर्थ काढून घेणे फार गरजेचे असते. त्यासाठी तुमची बौद्धिक क्षमता विकसित करण्याची गरज असते.
जे विचार आपल्याला आपल्या अंतःकरणात रुजवायचे असतात ते पुनःपुन्हा ऐकायचे असतात आणि ऐकताना त्यातल्या अर्थाकडे लक्ष ठेऊन तसे भाव आपल्या मनात निर्माण करायचे असतात म्हणजे अगदी कठीण प्रसंगात सुध्दा आपले प्रतिसाद चुकीचे येत नाहीत. याकरताच प्रार्थना आणि नित्यपाठ हे महत्वाचे. अनुभव ग्रहण करण्याचे आणि शब्दांच्या सहाय्याने येणारे ज्ञान ग्रहण करण्याचे आपल्या मेंदू मध्ये वेगवेगळे विभाग आहेत.
आपण स्वतः बोललेले आपण ऐकतो त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये त्या ज्ञानाच्या पेशी घडत असतात आणि पुन्हा कार्यान्वित होत असतात. त्यामुळे नेहमी शांतपणे ऐकण्यावर भर देणे गरजेचे असते. असे केल्याने समोरच्याचे बोलणे तर व्यवस्थित कळतेच. त्याशिवाय त्याचा सन्मान केल्याने त्याचा तुमच्याविषयीचा आदरभावदेखील वाढतो. समोरची व्यक्ती बोलत असताना तुम्ही जर उगाचच मोबाईलशी चाळे करीत असाल किंवा दुसरीकडे पहात असाल तर त्यातून योग्य तो संदेश पोहोचत नाही याची जाणीव सतत ठेवा. त्याप्रमाणे आपली वर्तणुक ठेवा. त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.