• Download App
    काँग्रेसच्या "ममता प्रयोगाची" ही तर डबल गेम...!!|Congress's Sonia card activated, its a stern political message for Mamata and Pawar!!

    काँग्रेसच्या “ममता प्रयोगाची” ही तर डबल गेम…!!

    काँग्रेसने म्हणता म्हणता ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांचीच खेळी उलटवली आहे. त्या कितीही भाजपचा “खेला होबे” म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे राजकीय टार्गेट काँग्रेस पक्षच राहिला आहे, हे उघड आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी सर्व तोंडी तोफा भाजपवर डागल्या, पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेस पक्ष फोडला. त्यावेळी बचावात्मक पवित्र्यात गेलेल्या काँग्रेस पक्षाने आता आक्रमक पवित्रा धारण करत ममता बॅनर्जी यांना धडा शिकवायचे ठरवलेले दिसत आहे Congress’s Sonia card activated, its a stern political message for Mamata and Pawar!!

    आणि हा धडा नुसताच ममता बॅनर्जी यांना शिकवायचा असे नाही, तर तो शरद पवारांनाही शिकवल्याशिवाय काँग्रेस पक्ष राहणार नाही, असा इशारा एकाच राजकीय कृतीतून काँग्रेसने दिला आहे. ही राजकीय कृती कोणती…?? तर काँग्रेसमध्ये आता “सोनिया कार्ड” ॲक्टिव झालेय, ही आहे…!!



    सोनिया गांधी परवा जयपूरच्या रॅलीत उपस्थित राहिल्या. ज्या रॅलीत राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात भेद आहे. मी हिंदु आहे, अशी जोरदार गर्जना केली त्या रॅलीमध्ये सोनिया गांधी यांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली आहे. त्यांनी तिथे जरी भाषण केले नसले तरी त्या नुसत्या उपस्थित राहिल्याने काँग्रेसचे राजकीय मनोधैर्य वाढलेले दिसत आहे.

    परवा रात्री सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची बैठक घेऊन संसदेतही विरोधकांची राजकीय स्ट्रॅटेजी ठरवली त्या बैठकीला त्यांनी शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टालिन यांना देखील निमंत्रण होते. परंतु उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी आपले प्रतिनिधी संजय राऊत यांना पाठवले, तर स्टालिन यांनी टी आर बाळू यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले.

    शरद पवार हे स्वतः सोनिया गांधींनी उपस्थित बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहिले. पवार जर त्या बैठकीस उपस्थित राहिले नसते तर त्याचा “वेगळा” राजकीय संदेश सोनिया गांधींपर्यंत गेला असता. बैठक राहुल गांधींनी बोलावली नव्हती, तर खुद्द सोनिया गांधींनी बैठक बोलवली होती यातच खरी राजकीय मेख दडली आहे…!! आणि त्यामुळेच पवारांना ती बैठक टाळणे जड गेले असावे.

    पवार तिथे गेले आणि त्यांना सोनिया गांधींनी नवीन “असाइनमेंट” दिली… ममता बॅनर्जी यांना पटवायची, म्हणजे समजूत काढायची. काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. बाकीच्या पक्षांनी त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली विरोधी बाकांवर बसायचे आहे. समन्वय राखायचा आहे, हा राजकीय संदेश ममता बॅनर्जी यांच्या पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांनी शरद पवारांवर सोपवली आहे.

    एकीकडे पवारांना ममता बॅनर्जी यांच्याकडे राजकीय शिष्टाईसाठी पाठवायचे आणि दुसरीकडे काँग्रेसचे लोकसभेत अले गटनेते अधीर रंजन चौधरी यांना ममता बॅनर्जी यांच्यावर “मुक्तपणे सोडायचे” हीच ती डबल गेम आहे…!! हाच तो काँग्रेसचा “ममता प्रयोग” आहे. अधीर रंजन चौधरी यांनी काल ममता बॅनर्जी यांच्या वरच्या शेलक्या आणि तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. एवढी तिखट टीका त्यांनी आत्तापर्यंत कधीही केली नव्हती.

    ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट दलाली करतात. विरोधी ऐक्य मोडण्यासाठी त्या वाटेल ते प्रयत्न करतात. त्यांना फक्त मोदींना खुश करायचे आहे. मोदी खुश झाले की त्यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी कोळसा घोटाळ्यासारख्या बड्या भ्रष्टाचारातून वाचू शकतात, असे त्यांना वाटते आहे, अशी घणाघाती टीका खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर केली आहे. ही टीका ऐकल्यानंतर ममता बॅनर्जी गप्प बसतील, ही शक्यता तरी आहे का…?? म्हणजेच एकीकडे शरद पवारांना शिष्टाईसाठी पाठवायचे आणि दुसरीकडे अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या नेत्यांना मुक्तपणे ममता बॅनर्जींवर “सोडायचे” ही ती डबल गेम आहे.

    गेल्या दोन महिन्यांत ममता बॅनर्जी यांनी अनेक राजकीय उड्या मारल्या. काँग्रेसला पाण्यात पाहिले. त्यामध्ये शरद पवार आणि शिवसेना देखील सहभागी करून घेतले. पण जेव्हा “सोनिया कार्ड” स्वतः ॲक्टिव झाले तेव्हा मात्र राजकीय खेळी उलटल्यात जमा आहे. राहुल गांधींना “खेळवणे” वेगळे आणि सोनिया गांधींशी “खेळणे” वेगळे…!! हे पवारांनी वेळीच ओळखल्यामुळे ते सोनिया गांधी यांच्या घरी बैठकीला 10 जनपथवर गेले.

    सोनिया गांधींच्या बैठकीला न जाणे म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारला धोका निर्माण करणे हे न कळण्याइतपत पवार राजकीय अपरिपक्व नाहीत. ते कदाचित सोनिया गांधींची असाइनमेंट पूर्ण करणार नाहीत, पण सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला न जाण्याची हिमाकत करणार नाहीत…!! हे पवारांना दाखवावे लागले. म्हणजे ज्या राहुल गांधींना ममता आणि पवार यांच्यासारखे नेते “खेळवू” शकत होते तेवढे सोनिया गांधींना “खेळवणे” सोपे नाही हे काँग्रेसने आता दाखवून दिले आहे. त्या अर्थाने काँग्रेसने “ममता प्रयोगाची” डबल गेम केली आहे…!!

    Congress’s Sonia card activated, its a stern political message for Mamata and Pawar!!

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!