विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रात ड्रग्ज प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना खरमरीत आशय असलेलं पत्र लिहिलं आहे. तुमच्या वडिलांनी ही वेळ आणली आहे असंही त्या म्हणाल्या आहेेेत.CHITRA WAGH VS THAKREY :Chitra wagh writes a letter to Aaditya Thakrey
चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना चार प्रश्न विचारत हे पत्र लिहिलं आहे. सरकारच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्यांची स्वप्न धुळीला मिळाल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश तुम्ही तरी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवा ते तुमच्याशिवाय इतर कुणाचं ऐकत नाहीत. वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्या असंही आवाहन आदित्य ठाकरेंना केलं आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचं पत्र ?
मा. आदित्य ठाकरेजी
खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती. परंतू तुमच्या वडिलांनी म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्याशिवाय कुणाचीही चिंता नाही.
तुमच्याशिवाय ते इतर कुणाचं ऐकत नाहीत. त्यामुळे मी तुमच्यामार्फत त्यांना विनंती करू इच्छिते की विद्यार्थ्यांचे भवितव्य धुळीला मिळते आहे त्याकडे लक्ष द्या. मुलाच्या भवितव्यासाठी वडील किती कष्ट घेतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमचे वडील स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वप्नं धुळीला मिळत आहेत.
मागील काही दिवसांपासून मी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ त्यांच्या निदर्शनास आणून देते आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या नात्याने राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत त्यांना हा विसर कसा काय पडू शकतो? आज पाचव्यांदा आरोग्य विभागाचा पेपर फुटला आहे. त्याबाबत माझे काही प्रश्न आहेत.
न्यासा या एजन्सीची चौकशी का लावली नाही?
या एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्या का टाकलं नाही?
एजन्सीला परीक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?
MPSC सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा या एजन्सीची निवड का केली?
या प्रश्नांची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत अशी अपेक्षाही चित्रा वाघ यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. चारवेळा ठेच लागूनही पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाते? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.