पुण्यातील लहान मुलांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी आणि या नियमांचे पालन करत त्यांना मोकळेपणाने सायकल चालविण्याचा सराव व्हावा, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकात ‘चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क साकारले आहे.’Children’s Traffic Park’ developed by Pune Municipal Corporation at Bremen Chowk
विशेष प्रतिनिधी
पुणे – पुण्यातील लहान मुलांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी आणि या नियमांचे पालन करत त्यांना मोकळेपणाने सायकल चालविण्याचा सराव व्हावा, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकात ‘चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क साकारले आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, राज्याच्या काही शहरांमध्ये ट्रॅफिक पार्क विकसित केले गेले असले, तरी संपूर्णतः लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून फक्त त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेले हे पहिलेच ट्रॅफिक पार्क ठरणार आहे. रस्ते, पदपथ, चौक, एकेरी मार्ग, सिग्नल, वाहतूक चिन्हांचे फलक अशा मोठ्या रस्त्यांवरील सर्व गोष्टी येथे लहान मुलांच्या दृष्टीने साकारण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या चिन्हांचा खेळ मुलांसाठी ज्ञानवर्धक ठरेल.
ब्रेमेन चौकाजवळील सिंध सोसायटीलगतच्या एक एकर जागेवर ट्रॅफिक पार्क निर्माण करण्यात आले आहे. त्यामध्ये चार मीटर रुंद आणि १६० मीटर लांबीच्या रस्त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. दुहेरी मार्ग, सायकल मार्गिका, पार्किंग व्यवस्था, तीन व चार रस्ते मिळणारे चौक, एकेरी मार्ग, सिग्नल यंत्रणा, पदपथ, पथदिवे यासह रस्त्यावर ठिकठिकाणी पाहायला मिळणारे वाहतूक चिन्हांचे फलक लहान स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. ट्रॅफिक पार्कमध्ये येणाऱ्या मुलांना वाहतूक चिन्हांची ओळख व्हावी, या दृष्टीने खेळाच्या स्वरूपात त्याची मांडणी करण्यात आली असून, मराठी आणि इंग्रजीतून त्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.