तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा रद्द
वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, चार पाच दिवस परीक्षा पुढे गेल्या तरी कोणीही परीक्षेपासून वंचित राहू नये ही त्यामागची भूमिका आहे. जे परीक्षेचे नियोजन करतात त्यांच्याकडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. Cancel the exam so that no one is deprived
दुसरीकडे, राज्यातील महापालिका निवडणुकांविषयी बोलताना ते म्हणाले की, सध्या आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाशी आघाडी करायची याबाबत राष्ट्रवादीने जिल्हा स्तरावर अधिकार दिलेत. शिवसेना आणि कॉंग्रेसची भूमिका त्यांचे नेते ठरवतील. त्या-त्या पक्षाच्या ताकदीनुसार जिल्ह्यातील लोकांवर निर्णय सोपवला जाईल. आम्ही राज्याच्या स्तरावर निर्णय घेणार नाही. सर्व निर्णय जिल्हा स्तरावरून होतील.
दरम्यान पत्रकारांनी भाजप आमदाराच्या प्रवेशावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहिती नाही, त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही. सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत ते म्हणाले की, आम्ही आमचा पॅनल उभा करू. बिनविरोध निवडणुक करण्याबाबत माहिती नाही.
दरम्यान, राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून शक्ती कायद्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शक्ती कायद्यासाठी समिती नेमली आहे. त्यांच्या बैठका होत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातलं आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा पारीत करण्याचा मानस आहे. महिलांना सुरक्षित वाटेल आणि चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.