- बजरंगी भाईजान व्यतिरिक्त, इतर अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुनीता शिरोळे सध्या बिकट स्थितीत आहेत आणि त्यांनी आर्थिक मदतीची याचना केली आहे. सध्या त्या नुपूर अलंकार यांच्या घरी त्यांच्या देखरेखीखाली आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांवर आर्थिक संकट कोसळलं. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ Bajrangi Bhaijaan या चित्रपटात भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता शिरोळे Sunita Shirole सध्या आर्थिक विवंचनेत आहेत.
सुनिता यांनी इंडस्ट्रीतील इतर कलाकारांकडे मदतीची विनंती केली आहे. ८५ वर्षीय सुनिता या एका फ्लॅटमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना त्याचं भाडं देता आलं नाही.Bajrangi Bhaijaan actress Sunita Shirole appeals for financial help, says ‘Aaj main duniya ke rehem aur karam par hoon’
सध्या सुनिता या नुपूर अलंकार यांच्या घरी राहत आहेत. काही दिवसांकरिता सुनिता यांची देखभाल नुपूर करत आहेत.
“कोरोना महामारीपूर्वी मी काम करत होते. मात्र लॉकडाउनमध्ये माझ्याकडील सर्व पैसे संपले. आरोग्याच्या समस्यांमुळे मला त्याच वेळी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. त्यातही मी रुग्णालयात दोन वेळा पडले आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. मला पैशांची गरज असल्याने मी पुन्हा काम करायला तयार आहे. मात्र सध्या मी नीट चालूही शकत नाही.
दोन्ही पायांवर उभं राहण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे. जेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे होते, तेव्हा मी अनेक गरजूंची मदत केली. पण एके दिवशी मलाच मदतीची विनंती करावी लागेल, याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. पतीच्या व्यवसायासाठी मी बराच पैसा खर्च केला होता. मात्र कंपनीला आग लागल्याने आम्हाला सर्व काही गमवावं लागलं होतं. २००३ मध्ये माझ्या पतीचं निधन झालं”, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.
सुनिता यांनी बजरंगी भाईजान, किसना, शापित, द लेजंड ऑफ भगत सिंग, मेड इन चायना यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याचसोबत त्यांनी किस देश मे है मेरा दिल, मिसेस कौशिक की पाच बहुए या मालिकांमध्येही काम केलं.