सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. अशी कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करु नका ! असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. अशी कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करु नका!, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली. मी कोणाचे काढून घेण्याकरिता किंवा हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. स्पर्धेच्या युगात चांगल्या सुविधा मिळतात त्याला गुंतवणूकदार पसंती देतात. सरकारचे स्थैर्य, पोषक वातावरण महत्वाचे असते. उगाचच चिंता कशाला करता, असे प्रत्युत्तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावर योगी आदित्यनाथ यांची ही प्रतिक्रीया होती.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक तर ठरणार नाही ना? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. लखनौ महापालिकेचे रोखे सूचीबद्ध करणे तसेच उत्तर प्रदेशात गुंतवणूकदार आणि चित्रपटसृष्टीला आकर्षित करण्याच्या उद्देशाने योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले होते. आदित्यनाथ यांच्या भेटीवरून राजकारण झाले. राज्यातील उद्योग जबरदस्तीने बाहेर नेण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ म्हणाले की, नोएडाजवळ हजार एकर जागेत चित्रनगरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणत्या सोयीसुविधा असाव्यात यासाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करण्यात येत आहे वा त्यांची मते जाणून घेण्यात आली. मुंबईची चित्रनगरी आम्ही उत्तर प्रदेशात घेऊन जात आहोत, असा प्रचार काही जणांनी सुरू केला. मुंबईची चित्रनगरी वा बॉलीवूड कायम राहिल. उत्तर प्रदेशात नवी चित्रनगरी उभारण्यात येणार आहे. शेवटी सामाजिक सुरक्षा महत्वाची असते.