शेतीमध्ये मजुरांवर होणारा खर्च त्या तुलनेत मोठा असतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती कधीही परवडतेच. त्यामुळेच भारतातही आता मोठ्या प्रमाणात शेतात ट्रॅक्टर तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात आहे. मात्र विकसित देशात आता येत्या काही वर्षांत रोबोंचाही शेतीसाठी वापर होवू लागला तर आश्चर्य वाटणार नाही. A strawberry picking robot every five seconds
अमेरिकेत फळांच्या शेतीसाठी अद्ययावत रोबो विकसित झाले आहेत. त्यांचा वापर सध्या तरी प्रायोगिक पातळीवर असला तरी काही काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जगात रोबोच्या क्षेत्रात अफाट वेगाने संशोधन होत आहे. लॅस एंजिल्स येथील रोबोटिक हार्वेस्टिंग या कंपनीने चक्क स्ट्राबेरी तोडण्यासाठी खास पद्धतीचा रोबो बनविला आहे.
फळांची लागवड तशी खर्चिक असते. त्याशिवाय प्रत्येक फळ तोडण्यासाठी तुलनेने अधिर मनुष्यबळ लागते. कारण प्रत्येक फळ हे नाजूक रितीने तोडणे वश्यक असते. त्यासाठी खर्चही जादा येतो. मात्र रोबोच्या वापराने यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या मशीनमधील रोबो कॅमेराद्वारे स्ट्राबेरीचे फळ कोठे आहे ते नेमकेपणाने शोधून काढतो. तर त्याचे हात अलगदपणे स्ट्राबेरी तोडून ती व्यवस्थितपणे पेटीत ठेवतात. हा रोबो हे काम अतिशय़ वेगाने व तितक्याच शफाईदारपणे करतो. त्यामुळे वेळेची व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते असा कंपनीचा दावा आहे.
हा रोबो दर पाच सेकंदाला एक या प्रमाणे स्ट्राबेरी तोडतो. त्यावरुन याच्या कामाचा झपाटा लक्षात येण्यास हरकत नाही. या रोबोची मोठ्या स्ट्राबेरीच्या शेतात मदत घेतल्यास पाच वर्षांत पन्नास ते साठ लाख रुपयांची मजुरीवरील बचत होवू शकते असा कंपनीचा दावा आहे. अर्थात ही बचत अमेरिकेतील खर्चाचा आधार घेवून काढलेली आहे. एक मात्र नक्की की या रोबोच्या मदतीने फळांचे कोणतीही नुकसान होत नाही. त्यामुळे प्रत्येक फळ व्यवस्थितपणे गोळा केले जाते.