विशेष प्रतिनिधी
पुणे : “वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल,” असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होऊन निराशा निर्माण झाली असताना मोदींच्या मंगळवारच्या संदेशामुळे चैतन्य निर्माण झाले आहे, असे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल. शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यावसायिक, लघू उद्योजक अशा सर्वांच्या सहभागाने देश आर्थिक महाशक्ती होईल, असे पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाम निर्धाराने कोरोनाच्या संकटकाळात देशाचे नेतृत्व करत असून त्यांना जनतेची साथ मिळालेली आहे. तशाच ठाम आत्मविश्वासाने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदी यांनी सोमवारी निर्णय जाहीर केला. देशाच्या सकल उत्पन्नाच्या दहा टक्के इतके ऐतिहासिक मोठे पॅकेज त्यांनी जाहीर केले आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळेल, विशेषतः कोरोनामुळे झळ पोहचलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना आधार मिळेल याची काळजी त्यांनी घेतली आहे.
जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांच्या मनात आशा निर्माण करणाऱ्या मोदी यांच्या घोषणेचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते, असे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारताकडे अफाट मनुष्यबळ, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि फार मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या क्षमतेचा पूर्ण वापर होण्याची आणि भारत आत्मनिर्भर होण्याची दिशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे स्पष्ट झाली आहे. मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत स्वयंपूर्ण होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात चांगला बदल घडेल याची आपल्याला खात्री वाटते.