विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर ८६% लोक समाधानी असल्याचे “जन की बात”ने केलेल्या सर्वेतून दिसून आले. संस्थेने देशभरातील दोन हजार लोकांशी फोनवर संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली. या मध्ये देशातील सर्व वयोगटातील, सर्व विभागातील, आणि सर्व स्तरांमधील लोकांचा समावेश आहे. ८६% लोकांनी उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले असले तरी तेवढ्याच लोकांना रोजगार आणि आर्थिक तणावाचीही भीती आहे. ८१% लोकांचा मोदींनी केलेल्या लॉकडाऊनला पाठिंबा आहे. सध्याच्या कोरोना संकटाचा अर्थ व्यवस्थेवर ताण पडणार नाही, असे फक्त ४% लोकांना वाटते. ४७% लोकांना कोरोना व्हायरसचा फैलाव हे चिनी कटकारस्थान वाटते तर २७% लोकांना ही चीनची चूक आहे, एवढेच वाटते. ती मुद्दाम केलेली चूक वाटत नाही. सर्वाधिक लोकांना सोशल मीडियातून कोरोनाचे गांभीर्य समजले. ३६% लोक टीव्हीवर कोरोनाची माहिती घेतात, तर फक्त १०% लोक प्रिंट मीडियावर अवलंबून आहेत. सरकारने कोरोना जागृतीच्या जाहिराती नेमक्या कोठे करायच्या यासाठी हा निदर्शक आलेख उपयुक्त आहे, असे दन की बातचे मुख्याधिकारी प्रदीप भंडारी यांनी सांगितले. ६५% लोकांना कोरोनाचा फैलाव लवकर रोखला नाही तर देशात अराजक माजेल, असे वाटते तर ५६% लोकांचा देशातील वैद्यकीय व्यवस्थेवर पुरेसा विश्वास नाही. आपली वैद्यकीय व्यवस्था अपुरी असल्याचे त्यांचे मत आहे.