विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित करणारे रामनंद सागर यांचे रामायण पुन्हा दूरदर्शनवर दिसणार असल्याने लोकांना विशेषत: कलाकारांना आनंदाचे भरते आले. रामायण मालिका तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा प्रक्षेपित करण्याचो ट्विट माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आणि समस्त भारतीय स्मरणरंजनात बुडून गेले. मालिकेत काम करणारे राम अरुण गोविल आणि सीता दीपिका यांचे मोबाईल अविश्रांत खणखणू लागले आणि या मालिकेच्या लोकप्रियतेचा प्रत्यय भारतीयांना पुन्हा आला. माझ्या नातवाला ही मालिका फार आवडते. मला रामरुपात पाहून त्याला अत्यानंद झाला होताच. आता तो आनंद त्याला पुन्हा मिळेल. रामकृपेनेच हे घडते आहे, अशी प्रतिक्रिया अरुण गोविल यांनी व्यक्त केली, तर दीपिका यांना चाहत्यांचे फोन पुन्हा आले. रामायणात हनुमानाची भूमिका करणारे पहिलवान दारासिंग आपल्यात नाहीत, पण त्यांची शेवटची इच्छा रामायण पुन्हा पाहण्याची होती, अशी आठवण त्यांचे पुत्र विधू दारासिंग यांनी सांगितली. १९८० च्या दशकात रामायण मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. मालिका दूरदर्शनवर लागली की शहरे, गावांनधले रस्ते ओस पडायचे. लोक टीव्ही संचाला पुष्पहार घालून उदबत्ती ओवाळून रामायण लावायचे आणि श्रद्धेने पाहायचे. राम अरुण गोविल आणि सीता दीपिका चिखलिया यांना देवरुपात पाहायचे. त्यावेळच्या लोकप्रियतेवर आरूढ होऊन दीपिका निवडणूक जिंकून भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पोचल्या होत्या. रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी हे देखील याच लाटेत खासदार झाले. अरुण गोविल यांनी रामाच्या वेशात काँग्रेसचा प्रचार केला. ही लोकप्रियत मालिका दररोज सकाळी ९.०० ते १० व रात्री याच वेळेत दिसणार दूरदर्शनवर दिसणार आहे.