देश चीनी व्हायरसविरोधात लढत आहे. मात्र, कॉंग्रेसला यामध्येही आता राजकारण करायचे आहे. यासाठी कॉँग्रेस पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांंच्या अध्यक्षतेखली सल्लागार गटाची स्थापना करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देश चीनी व्हायरसविरोधात एक होऊन लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे. लॉकडाऊनचा कठीण कालावधी आर्थिक झळ सोसून देशवासियांनी पार नेण्याचे ठरवले आहे. मात्र या अभुतपूर्व संकटाच्या स्थितीतही देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसला राजकारण करायचे आहे. चिनी विषाणूच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी कॉँग्रेसने चक्क माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार गटाची स्थापना केली आहे.
एका बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य असल्याचे कॉँग्रेस म्हणत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला कट्टर मोदी विरोधक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह ११ सदस्य या सल्लागार गटात असणार आहेत. चीनी व्हायरसवरून राजकारण करण्याची प्रत्येक संधी शोधणारे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचाही यात समावेशआहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी या सल्लागार गटाची स्थापना केली आहे. देशात अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातली वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला आहे. रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील. सल्लागार गट सामान्यत: रोजच्या निरनिराळ्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि विविध मुद्द्यांबाबत पक्षाची मते मांडण्यासाठी व्हिडीओ कॉन्फसन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहे.