कोविड-19 शी लढा देणाऱ्या रुग्णालयांना निजंर्तुक करणारे मशीन नेमके कशा प्रकारे काम करते याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर या यंत्राचे उत्पादन व वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दिले एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये बसविण्यासाठी लवकरच अशी 1,000 यंत्रे तयार होणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी पार्कमधील एक उदयोन्मुख स्टार्ट अप सायटेक एरॉन या कंपनीने हवेतील विषाणूंना निष्क्रिय करणारे मशीन तयार केले आहे. कोविड-19 शी लढा देणार्या रुग्णालयांना निजंर्तुक करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरणार आहे.
हे मशीन नेमके कशा प्रकारे काम करते याची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानंतर या यंत्राचे उत्पादन व वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दिले एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये बसविण्यासाठी लवकरच अशी 1 हजार यंत्रे तयार होणार आहेत.
धूळ, प्रदूषित हवेतील विषाणूंना निष्क्रिय करून हवा शुद्ध करणारे हे मशीन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळ उद्योग समूहाचे संचालक अभिजित पवार यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी पवार यांनी सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी पार्कमधील शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी तयार केलेल्या मशीनची माहिती पंतप्रधानांना दिली होती. याबाबतची सविस्तर माहिती पाठविण्यास पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. ही माहिती मिळाल्यावर पंतप्रधानांनी तातडीने विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी दिला. या मदतीतून १ हजार यंत्रे तयार केली जाणार आहेत.
विलगीकरण सुविधांमध्ये काम करणार्या परिचारिका, कर्मचारी व डॉक्टर यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तसेच विषाणूशी लढण्याची क्षमता वाढवून त्यांच्या आरोग्याची काळजी यामुळे घेतली जाणार आहे. या मशीनमुळे कोरोनासह पोलिओ, इन्फ्ल्युएंझा, कॉक्सॅकी विषाणूंसह कॉलिफॉर्म आणि बॅसिली जिवाणूंना मनुष्याच्या शरीरात जाण्यापासून रोखले जाऊ शकते, असा दावा संस्थेने केला आहे.
केंद्र सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे निधी प्रयास या योजनेअंतर्गत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कतर्फे वायू प्रदूषण नियंत्रित करण्याकरिता तसेच आजार पसरवणार्या जिवाणू आणि विषाणू यांना मारण्याकरिता सायटेक एरॉन हे मशीन विकसित करण्याचे ठरवण्यात आले. आयन जनरेटर मशीन आपल्या खोलीत काही वेळ चालू ठेवल्यास संबंधित ठिकाणचे हवेतील विषाणूंच्या संख्येत पूर्णपणे घट होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. एक हजार स्क्वेअर फुटांना एक मशीन कार्यालय, घर आदी ठिकाणी वापरता येते. रुग्णालयात पाचशे चौरस फुटांवर एक मशीन वापरता येऊ शकते.
नऊ किलो वजनाचे सायटेक मशीन निगेटिव्ह चार्ज उत्पादित करत असते. हवेतील वेगवेगळ्या विषाणूंच्या भोवती जे कवच असते त्यामध्ये प्रोटीन व फॅट्स असतात.
प्रोटीनच्या माध्यमातून हायड्रोजन आयनची निर्मिती होत असते. हवेतील पाण्याशी त्याचा संपर्क आल्यानंतर त्यातून हायड्रोजन पॅरॉक्साइड आणि हायड्रोजन आॅक्साइड या दोन निगेटिव्ह आयनची उत्पत्ती होते. अॅटमॉस्फेरिक डिटर्जंट्स म्हणूनही त्यांना ओळखले जाते. या मशीनच्या माध्यमातून निगेटिव्ह चार्ज निर्माण केला जातो आणि प्रत्येक सेकंदाला सुमारे एक मिलियन निगेटिव्ह आयनचा मारा विषाणूंवर होऊन विषाणूभोवतीचे प्रोटीनचे कवच मोडले जाते. त्यामुळे विषाणू निष्क्रिय होतो.
मनुष्यावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. हे निगेटिव्ह आयन हवेतील प्रदूषण, धूळ आणि विषाणू निष्क्रिय करतात. कोरोना विषाणू, पोलिओ विषाणू, इन्फ्ल्युएंझा विषाणू, कॉक्सॅकी विषाणू, कॉलिफॉर्म बॅक्टेरिया, बॅसिली जिवाणू अशा विविध विषाणू-जिवाणांपासून होणारे आजार रोखण्यासाठी हे मशीन फायदेशीर ठरू शकते. या मशीनची किंमत सुमारे ४० हजार असून मोठया प्रमाणात त्याची निर्मिती करण्याकरिता पाच कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे.