विशेष प्रतिनिधी
चंदीगड : हरियाणात चीनी व्हायरसशी स्वत:च्या प्राणाचा धोका पत्करूनही लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाहीर केला आहे.
डॉक्टर, नर्स, पँरामेडिकल स्टाफ, हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी, रुग्ण वाहिका कर्मचारी, कोरोना चाचणी केंद्रातील कर्मचारी या सर्वांना कोरोनाचे संकट संपुष्टात येण्याच्या कालावधीपर्यंत या पगारवाढीचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून खट्टर यांचे अभिनंदन करताना या पगारवाढीच्या निर्णयाचे श्रेय घेतले. आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस या सर्वांना पगारवाढीचा लाभ द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षानेच केल्याचे सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, तबलिगी कार्यक्रमानंतर हरियाणात कोरोनाग्रस्तांचा आकडा एकदम वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने ३७ संवेदनशील विभाग ओळखून गावे सील केली आहेत. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी तबलिगींवर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.