• Download App
    साखर कारखान्यांना हॅँड सॅनिटायझर उत्पादनाची परवानगी | The Focus India

    साखर कारखान्यांना हॅँड सॅनिटायझर उत्पादनाची परवानगी

    कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हॅँड सॅनिटायझरचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्या साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्याची योजना केंद्रातर्फे आखली जात आहे. अशा कारखान्यांना उत्पादन वाढवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले आहे. साधारणत: 45 साखर कारखाने आणि 564 इतर उत्पादकांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. आणखी 55 कारखान्यांना येत्या एक-दोन दिवसात परवानगी दिली जाईल.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर जंतूनाशकांची मागणी सातत्याने वाढली आहे. देशाची उपलब्ध उत्पादन क्षमता लक्षात घेता या वाढत्या मागणीमुळे सॅनिटायझर्स म्हणजेच जंतूनाशकांचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये याचे उत्पादन घेण्यास केंद्राने परवानगी द्यायचे ठरवले आहे. ऊसापासून साखर तयार करत असताना इथेनॉलची निर्मिती होते. या इथेनॉलमधील शुद्ध अल्कोहोलचे प्रमाण लक्षात घेता साखर कारखाने चांगल्या दर्जाचे सॅनिटायझर तयार करु शकतात.

    केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांचाही पर्यायाने उस उत्पादक शेतकऱ्यांचाही लाभ होणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना योग्य किंमतीत सॅनीटायझर उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्नही यशस्वी होणार आहे. सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णालयांना हे हँडसॅनिटायझर्स योग्य किमतीत मिळावे यासाठी सरकारने त्यांची एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत निश्चित केली आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सच्या 200 मि.ली. बाटलीची किरकोळ किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.

    कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी नागरिक,आरोग्यसेवक, रुग्णालय इत्यादींमध्ये हॅन्ड सॅनिटायझर्स वापरले जात आहेत. त्यामुळे हँडसॅनिटायझर्सच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मागणीनुसार पुरवठा व्हावा म्हणून महसूल आयुक्त, साखर आयुक्त आणि औषधनियंत्रक या राज्य सरकारच्या यंत्रणा तसेच विविध राज्यांचे जिल्हाधिकारी यांनी हॅन्ड सॅनिटायझर्स उत्पादकांना इथेनॉलचा पुरवठा होण्याबाबतच्या सर्व अडचणी दूर करण्यास सांगितले आहे. हँड सॅनिटायझर्सचे उत्पादन करू शकणाऱ्या ऊस गाळप कारखान्यांना त्यासाठी परवानग्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे साखर कारखाने हॅन्ड सॅनिटायझर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत असतील त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आहे. अशा कारखान्यांना उत्पादन वाढवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले आहे.

    साधारणत: 45 साखर कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. आणखी 55 साखर कारखान्यांना येत्या एक-दोन दिवसात ही परवानगी दिली जाईल. सध्याच्या परिस्थितीत आणखी कारखान्यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यातील बहुसंख्य उत्पादकांनी उत्पादन सुरू केले आहे. इतर काही येत्या आठवडाभरात उत्पादन सुरू करतील. त्यामुळे ग्राहक तसेच रुग्णालयांना हॅन्ड सॅनिटायझर्सचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहील.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…