‘दुष्मन का दुष्मन दोस्त होता है’, हा डायलॉग हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेळा ऐकला असेल. दुष्मनी करण्यासही हरकत नाही. पण त्यासाठी वेळ पाहावी लागते. आज संपूर्ण देश चीनी व्हायरसच्या विरोधात लढत असताना देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही. तरच देशाला भवितव्य असेल. संकटाचे हे दिवस गेल्यावर पुन्हा राजकारण आहे, राजकारणाचा आखाडाही आहे. पण कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना हे समजून कोण सांगणार? जागतिक संकटाच्या काळात त्यांना जागतिक पातळीवरील नेते बनायचे आहे. पण रिझर्व्ह बॅँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले रघुराम राजन यांनी तरी किमान आपली जबाबदारी ओळखायला हवी होती. पण एक भारतीय म्हणून त्यांनाही हा डायलॉग माहित असेलच आणि त्याप्रमाणे वागायचे त्यांनी ठरविले असावे.
अभिजित विश्वनाथ, नवी दिल्ली
दुष्मन का दुष्मन दोस्त होता है हा डायलॉग हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेळा ऐकला असेल. दुष्मनी करण्यासही हरकत नाही. पण त्यासाठी वेळ पाहावी लागते. आज संपूर्ण देश चीनी व्हायरसच्या विरोधात लढत असताना देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही. तरच देशाला भवितव्य असेल. संकटाचे हे दिवस गेल्यावर पुन्हा राजकारण आहे, राजकारणाचा आखाडाही आहे. पण कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना हे समजून कोण सांगणार? जागतिक संकटाच्या काळात त्यांना जागतिक पातळीवरील नेते बनायचे आहे. पण रिझर्व्ह बॅँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले रघुराम राजन यांनी तरी किमान आपली जबाबदारी ओळखायला हवी होती. पण एक भारतीय म्हणून त्यांनाही हा डायलॉग माहित असेलच आणि त्याप्रमाणे वागायचे त्यांनी ठरविले असावे.
खरे तर कॉँग्रेसचा दावा आहे की त्यांची संघटना संपूर्ण देशभर आहे.त्यामुळे चीनी व्हायरसच्या संकटात ही सगळी कार्यकर्त्यांची फौज सेवाभावी कामासाठी उतरवायला हवी. परंतु, कॉँग्रेसच्या राजकारणाचे गेल्या सहा वर्षांपासून सूत्र बनले आहे की स्वत:च्या संघटनेत प्राण फुंकण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य बनवायचे. खरे तर इतिहासापासून काही धडा घ्यायचा असतो. परंतु, आपल्या इतिहासाचा नेहमी दाखला देणार्या कॉँग्रेसने हा धडा घ्यायचाच नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे ‘चौकीदार चोर है’ पासून ते ‘सुट बुट की सरकार’ सारखे सगळे आरोप जनतेने नाकारूनही राहूल गांधीं शिकायला तयार नाहीत.
त्यांना सोपा मार्ग हवा असतो. त्यामुळेच त्यांनी आता अर्थव्यवस्थेवर बोलायला सुरूवात केली आहे. याबाबत सोशल मीडियावर आलेली एक प्रतिक्रिया खूप बोलकी होती. त्यामध्ये म्हटले होते की, अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी चर्चा करणार, या शतकातील मोठा विनोद!
पण आताच्या काळात अर्थव्यवस्थेवर बोलणे खूपच सोपे आहे. याचे कारण म्हणजे चीनी व्हायरसच्या उद्रेकाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांनी सांगितले होते की ‘जान है तो जहान है’. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे हे सांगण्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञांची गरज नाही. पण आजच्या संकटाच्या घडीत प्राधान्य कशाला द्यायचे हा देखील प्रश्न आहे. लोकांना मरण्यासाठी सोडून द्यायचे की अर्थव्यवस्था विकलांग होतेय म्हणून सगळे काही उघडे करायचे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हाच विचार केला. न्यूयॉर्क शहर लॉकडाऊन केले तर देशातील ११ टक्के अर्थव्यवहार बंद होतील, म्हणून हा निर्णय घेतला नाही. त्याचा फटका बसला आणि एकट्या न्यूयॉर्क शहरात काही हजार मृत्यू झाले.
राहूल गांधी यांनी रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. हा संवाद केंद्र सरकारच्या निर्णयांवर टीका करण्यासाठीच होता हे स्पष्ट होते. याचे कारण म्हणजे राजन यांचे मोदी सरकारशी असलेले ‘प्रेमाचे संबंध’ सगळ्यांनाच माहित आहेत. राजन हे यूपीए जवळचे मानले जातात.
यूपीएच्या दुसर्या कार्यकाळातच रघुराम राजन यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड करण्यात आली होती. मोदी सरकारचा मोठा आर्थिक निर्णय असलेल्या जीएसटीवर रघुराम राजन यांनी टीका केली होती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ नाकारला. तेव्हापासून तर ते मोदी सरकारचे कडवे टीकाकार बनले होते. अनेकदा त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जाहीररित्या टीका केली आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी लोकसभा गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान, यूपीए सत्तेत आली तर रघुराम राजन यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे राजन यांनी त्याचा इन्कार केला नव्हता.
राहूल गांधी आणि राजन यांचा आजचा संवाद ठरवून झाल्यासारखाच होता. मोदी सरकारला घेरण्यासाठी हेडलाईन मॅनेजमेंट करून प्रश्न विचारण्यात आले. देशातील टेस्टींगबाबतच्या प्रश्नावर राजन म्हणाले की दररोज किमान २० लाख चीनी व्हायरसच्या चाचण्या व्हायला हव्यात. जगातील सगळ्याच देशात हा रोग पसरला असल्याने चाचण्यांसाठी टेस्टींग किट मिळत नाहीत. केंद्र सरकार वेगवेगळ्या देशांतून त्या मिळवित आहे. इतक्या चाचण्या एका दिवसात करणे शक्य नसल्याचे त्यांनाही माहित असेल. पण जबाबदारी नसल्यावर सल्ले देणेही सोपे असतेच.
देशातील लॉकडाऊनवरही चर्चा झाली. मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यावर राहूल गांधी आणि कॉँग्रेसने यावर टीका केली होती. पण आता सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची तयारी करत आहे. त्यावेळी मात्र राहूल गांधी लॉकडाऊन उठविणे कसे गंभीर आहे, हे म्हणत आहे. त्यामुळेच राजन यांनी लॉकडाऊन उठविण्याच्या बाजुने उत्तर दिले. परंतु, त्यासाठी त्या भागातील किमान १० हजार नागरिकांची चाचणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आता ही देखील अशक्य कोटीतील गोष्ट आहे, याची त्यांना निश्चित जाणीव असेल. कारण १३० कोटींच्या देशात अशा पध्दतीने चाचण्या केल्या तर खर्या संशयितांसाठी टेस्टींग किटच उपलब्ध होणार नाहीत.
लोकशाही व्यवस्थेत जबाबदार विरोधी पक्षाची आवश्यकता यामुळेच अधोरेखित होते. १९७१ मध्ये बांग्ला देश युध्दाच्या वेळी त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांचा दुर्गा असे म्हणून गौरव केला होता. आजची चीनी व्हायरसविरोधातील लढाई त्यापेक्षा कितीतरी मोठी असताना पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले नाही तरी चालेल परंतु लोकांची दिशाभूल व्हावी अशा पध्दतीने टीका तरी करू नये, ही केंद्र सरकारची रास्त अपेक्षा असेल. परंतु, वाजपेयी यांच्या विचारांची उंची घराणेशाहीच्या माध्यमातून सहजपणे नेते बनलेल्या राहूल गांधी यांच्यामध्ये येणार कशी?